भुसणीच्या मार्कंडेय नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
By Admin | Updated: October 6, 2015 22:20 IST2015-10-06T22:18:58+5:302015-10-06T22:20:51+5:30
शेतकऱ्यांना वरदान : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळवण गटात एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

भुसणीच्या मार्कंडेय नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
कळवण : जिल्हा परिषद व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील भुसणी शिवारातील मार्कंडेय नदीवर दोन सीमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओसंडून वाहत असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले असून, परिसराला नवसंजीवनी मिळणार असल्याने या परिसरातील शेतकरीबांधवांनी या बंधाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांच्या हस्ते जलपूजन केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होईल. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊन शेतकरी सुखी होऊन आर्थिक सुबत्ता नांदेल. पाणी अडविले जाऊन शिवार जलमुक्त होणार असून, यासाठी तालुक्यातील ११ गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान हे टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रभावीपणे राबविल्याने कळवण जिल्हा परिषद गटात वर्षभरात १७ सीमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्याने जवळपास एक हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे यांनी दिली.
मार्कंडेय नदी पावसाळा संपल्यानंतर तीन ते चार महिने वाहत होती. असे असताना या परिसराला एप्रिल ते जूनपर्यंत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. आता मात्र हे सीमेंट बंधारे बांधण्यात आल्याने बंधाऱ्यापासून अर्धा किमीपेक्षा जास्त पाण्याची साठवण होत आहे. परिणामी विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. शिवाय पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळी पीक आता शेतकऱ्यांना घेता येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पूजनावेळी भुसणी येथील शेतकरी नामदेव खैरनार, विजय सूर्यवंशी, मिलिंद खैरनार, बापू खैरनार, नंदकुमार खैरनार, राजेंद्र पगार, रामदास सूर्यवंशी, युवराज सोनवणे, विष्णू अहेर, राजेंद्र खैरनार, बापू अहेर, सचिन खैरनार, सुधाकर खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)