हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्कार वितरण
By Admin | Updated: May 21, 2016 23:03 IST2016-05-21T23:02:08+5:302016-05-21T23:03:36+5:30
नाभिक मेळावा : १२० समाजबांधवांचा सन्मान

हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्कार वितरण
नाशिक : नाभिक महामंडळातर्फे समाजाच्या एकत्रीकरणासाठी ‘नाभिक जोडो’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२० समाजबांधवांना हुतात्मा वीर भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात नाभिक समाजाच्या महामेळाव्याचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी भगवान बिडवे होते. व्यासपीठावर दत्ता अनारसे, भिवंडी स्थायीचे सभापती प्रशांत लाड, नागपूरचे स्थायीचे सभापती बंडू राऊत, अंबादास पाटील, प्रभाकर लवांदे, दिलीप अनारसे, शशी अहिरे आदि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, कला, नाट्य, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नाभिक समाजातील व्यक्तींचा हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी वृद्ध नाभिक व्यावसायिकास शासनातर्फे निवृत्तिवेतन मिळावे, आरोग्य सुविधा, गटई कामगार योजनेप्रमाणे व्यवसायासाठी टपऱ्या मिळाव्यात, तसेच नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, समाजासाठी स्वतंत्र संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आदि मागण्यांचा प्रस्ताव यावेळी संमत करून त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी नाभिक समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक भगवान बिडवे यांनी केले. मेधा पेठकर यांनी सूत्रसंचालन, तर अरुण सैंदाणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)