मालेगाव : तालुक्यातील मांजरे येथे प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराने खून केल्याचा संशय असून या प्रकरणी तालुका पोलिसात संशयित आरोपी सागर राजेंद्र इंगळे रा. सोयगाव आणि मयताची पत्नी सुनीता उर्फ राणी यांचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयताचा भाऊ दीपक कारभारी ठाकरे (४४) रा. झाडी नेहरु नगर वस्ती यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. मांजरे शिवारात पुंजाराम साळुंके यांच्या शेतास लागून असलेल्या सावकारवाडीकडे जाणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्यावर ही घटना ९ जुलै रोजी घडली होती. मयत देवीदास कारभारी ठाकरे (४०) रा. झाडी शिवार, नेहरू वस्ती याची पत्नी संशयित आरोपी सुनीता उर्फ राणी व संशयित आरोपी सागर इंगळे यांचे अनैतिक प्रेमसंबध होते असे फिर्यादीत म्हटले आहे. सागर इंगळे व सुनीता देवीदास ठाकरे या दोघांनी मिळून त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून देविदास यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारून खून केला असावा व कोणास काही समजू नये म्हणून त्यांचे शव रस्त्याच्या कडेला टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा , असा फिर्यादीचा संशय आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु मयताच्या भावाने खुनाचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपाास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.
मालेगाव तालुक्यात पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 17:00 IST