पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:47+5:302021-04-30T04:18:47+5:30
नाशिक : विवाहानंतर आपल्या पत्नीचा नातेवाइकांच्या संगनमताने वेळोवेळी माहेरघरुन एक लाख रुपये आणून देण्यासाठी छळ करत तिला आत्महत्या करण्यास ...

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी
नाशिक : विवाहानंतर आपल्या पत्नीचा नातेवाइकांच्या संगनमताने वेळोवेळी माहेरघरुन एक लाख रुपये आणून देण्यासाठी छळ करत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने मयत विवाहितेचा पती स्वप्नील सुरेश बागड(२९,रा. राजरत्न नगर, सिडको) यास दहा वर्षांची सक्तमजुरी आणि १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
''माहेरून एक लाख रुपये घेऊन ये...'', असा तगादा लावून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत २०१६ साली घडली होती.
पीडित विवाहितेचे वडील फिर्यादी निगप्पा सातप्पा तेमीनफेरी (६७ रा. नागपसुर ता. अक्कलकोट जि. सोलापूर) यांच्या मुलीचा विवाह स्वप्नीलसोबत झालेला. लग्नानंतर स्वप्नील हा त्याच्या इतर नातलगासोबत मिळून मुलीचा पैशांसाठी छळ करत होता. त्याच्या छळाला कंटाळून मुलीने १६ मे २०१६ रोजी आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक आर. जी. सहारे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले. गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली.