बिबट्याचे ‘सावज’ चोरट्यांकडून ‘शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 00:09 IST2016-02-14T00:06:46+5:302016-02-14T00:09:20+5:30
’ंसरदवाडी : कुलूप तोडून पिंजऱ्यातील बकरी चोरून नेल्याने शेतकऱ्यांत संताप

बिबट्याचे ‘सावज’ चोरट्यांकडून ‘शिकार
शरद बोंबले सरदवाडी
सिन्नर जवळील सरदवाडी गावालगत गेल्या महिन्याभरापासून ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवण्यात आलेली बकरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेले बकरीचे सावजाची चोरट्यांनीच ‘शिकार’ केल्याने बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
सिन्नर शहराजवळच्या सरदवाडी शिवारात सुमारे महिनाभरापासून बछड्यांसह बिबट्याचे वास्तव्य आहे. गावालगतच्या अनेक शेतांमध्ये त्याच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या आहेत. तरुणांसह शेतकरी व महिलांनाही अगदी जवळून बछड्यांसह बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गावालगतच अनेकदा बिबट्या दिसून आल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी सरदवाडी ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार वनविभागाने ४ फेब्रुवारी रोजी सरदवाडी शिवारात दर्शन देणाऱ्या बिबट्या मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
बिबट्याने परिसरातील अनेक मोकाट कुत्र्यांची शिकार केल्याने पिंजरा लावल्यानंतर त्यात त्याला अडकविण्यासाठी सावज म्हणून कुत्र्याचे पिल्लू ठेवले होते. तथापि, पहिल्या रात्री बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही. दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निफाड तालुक्यातल्या बेरवाडी येथून बकरी आणून पिंजऱ्यात ठेवली. वनकर्मचारी दररोज सायंकाळी पिंजऱ्यात बकरी ठेवतात अन् सकाळी पुन्हा काढून घेतात.
शुक्रवारीही सायंकाळीही वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याची जागा बदलून बकरी पिंजऱ्यात ठेवली होती. पिंजऱ्यास कुलूप लावून त्यावर वाळलेले गवत ठेवले होते. शनिवारी सकाळी गवत विस्कटलेले, पिंजऱ्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आणि बकरी गायब असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सिरसाट यांच्यासह शेतकऱ्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही बकरी मिळून आली नाही.
दरम्यान, सरदवाडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार अद्यापही कायम आहे. दररोज गावालगतच्या वेगवेगळ्या शेतांमध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून येत आहेत. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या बछड्यांसह बिबट्याचे दर्शन झाले आहे. सिन्नर तालुक्यातील सरदवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याच पिंजऱ्यात ठेवलेली बकरी अज्ञात चोरट्यांनी पिंजऱ्याचे कुलूप तोडून चोरून नेली.