पाच हजार विडी कामगारांची उपासमार
By Admin | Updated: April 6, 2016 23:03 IST2016-04-06T22:58:07+5:302016-04-06T23:03:19+5:30
दुष्काळात तेरावा : कारखानदारांच्या बेमुदत संपामुळे विडी उद्योगाच्या माहेरघरी शुकशुकाट

पाच हजार विडी कामगारांची उपासमार
शैलेश कर्पे सिन्नर
केंद्र शासनाने विडी बंडलवर ८५ टक्के धोकादायक चित्र छापण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात विडी कारखानदारांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सिन्नरचे सर्व विडी कारखाने बंद असल्याने सुमारे ५ हजार विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासन आणि कारखानदार यांच्या वादात दररोज मोलमजुरी
करून पोट भरणाऱ्या विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला
आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र कामाची ओरड केली जात असताना विडी कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांना संप मिटण्याच्या निर्णयाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.
विडी उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या सिन्नर
तालुक्यातील सुमारे ५ हजार कामगारांचा उदरनिर्वाह विडी उद्योगावर अवलंबून आहे. सिन्नर तालुक्यात साबळे वाहिरे आणि कंपनी (संभाजी विडी), श्रमिक सहकारी संस्था (उंट विडी)
व कॉक ब्रॅँड विडी (कोंबडा छाप) यांचे कारखाने आहेत. या विडी कारखान्यातून सुमारे ५ हजार कामगारांना रोजगार मिळतो. विडी बांधण्याच्या कामात महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.