नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ‘एकता दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला. राष्ट्राच्या एकतेसाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्य सर्व भारतासाठी प्रेरणादायी असल्याचे मत झगडे यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते. एकता दौडला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून प्रारंभ करण्यात आला. सीबीएस, जुना आग्रा रोड, त्र्यंबकनाका, जिल्हा रु ग्णालयामार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर दौडचा समारोप करण्यात आला. या दौडमध्ये एनसीसी कॅडेट, पोलीस दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान, अग्निशामक दलाचे जवान विविध स्पोर्टस् क्लबचे खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
‘एकता दौड’मध्ये शेकडो नाशिककरांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:47 IST