गत वर्षभरात दीडशे अल्पवयीन मुलींचे पलायन...
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-03T23:40:26+5:302016-04-04T00:10:55+5:30
चिंताजनक : आठवड्यात किमान दोन अपहरणाचे गुन्हे; पोलिसांचे पालकांना आवाहन

गत वर्षभरात दीडशे अल्पवयीन मुलींचे पलायन...
विजय मोरे नाशिक
भाजीपाला खरेदी, शाळा, महाविद्यालय, मैत्रीण, नातेवाईक यांच्याकडे जाऊन येते, अशी विविध कारणे सांगून घराबाहेर पडलेली वयात आलेली मुलगी घरी परत आली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत वर्षभरात सुमारे दीडशे अल्पवयीन वा वयात आलेल्या मुली अशाप्रकारची कारणे सांगून घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली असून, अपहरणाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत़ या प्रकारच्या घटना थांबविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून पालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे़
पालकांचे मुलांकडील दुर्लक्ष व पौगंडावस्थेतील आकर्षणाला प्रेम समजून भविष्याचा विचार न करता घर सोडून निघून जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या अधिक असून, त्यांच्या आयुष्याची वाताहत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़ त्यापैकी एक घटना जानेवारी २०१६ मध्ये उघडकीस आली होती़ शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी व सुखेनैव कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयातीलच एका तरुणाशी सूत जुळले़ त्यातून या मुलीने घरातून मोठी रोकड व दागिने घेऊन मुलासह पलायन केले़ यानंतर या दोघांचाही पैशांच्या कारणास्तव त्यांच्या मित्रांनीच खून केल्याचे समोर आले़
नोकरी-धंद्यामुळे पालकांकडे वयात आलेल्या पाल्यांकडे (मुलगा, मुलगी) लक्ष देण्यासाठी वेळ नाही़; मात्र पाल्यांसाठीची दरमहा आर्थिक तरतूद, अत्याधुनिक सोयी-सुविधा, संपर्काची जलद साधने (मोबाइल, इंटरनेट) व स्वातंत्र्य पुरेपूर कसे मिळेल याची ते आवर्जून काळजी घेतात़ पालकांच्या या अतिकाळजीचा वा स्वातंत्र्याचा गैरफायदा पाल्यांकडून घेतला जातो की काय? अशी भयावह परिस्थिती आहे़ शहरात आठवड्यातून किमान दोन-तीन अल्पवयीन मुली घर सोडून निघून जात असल्याचे समोर आले आहे़