शेकडो हेक्टर जमिनीचे झाले कुरण!
By Admin | Updated: February 16, 2016 23:06 IST2016-02-16T22:24:22+5:302016-02-16T23:06:39+5:30
विकासाला खीळ : जिल्हा प्रशासनासह राजकीय अनास्थेचा फटका

शेकडो हेक्टर जमिनीचे झाले कुरण!
योगेश सगर कसबे सुकेणे
जिल्ह्यात कसबे सुकेणे ते ओझर या बंद रेल्वेमार्गाची जमीन ताब्यात असतानाही अनेक वर्षांपासून ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’ या प्रमाणे शेकडो हेक्टर जमीन पडून असल्याने त्याचे कुरण झाले आहे. जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाला जिल्हा प्रशासन आणि राजकीय अनास्थेचा फटका बसला आहे.
ओझर येथील लढाऊ विमाननिर्मिती कारखाना उभारणीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ओझर मिगपर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता; परंतु सध्या हा मार्ग बंद असून, जमीन मात्र रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात
आहे. हा मार्ग प्रशासनाने वापरात आणावा नाही तर संपादन केलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करावी, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, दीपक पगार, सोमनाथ बोराडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर सुकेणे ते ओझर रेल्वेमार्गाचा प्रश्न चव्हाट्यावर आला.
तीस वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या आदिवासी भागाचा विकास होण्यासाठी तयार असलेल्या मार्गाचा ओझर मिग येथून विस्तार करून तो साकोरे मिग-चिंचखेड-खेडगाव-सोनजांब-तळेगाव वणी - वणी शहर - पांडाणे - घागबारी - बोरगाव-सापुतारा असा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ओझर-वणी-सापुतारा या रेल्वेमार्गाची मागणी आता जोर धरू लागली असून, ओझरपर्यंत असलेल्या तयार रेल्वेमार्गाचा विस्तार झाला तर ओझर, पिंपळगाव बसवंत, खेडगाव, वणी यासारख्या कृषी बाजारपेठा रेल्वेच्या नकाशावर येऊन सापुताऱ्यासारखे पर्यटनस्थळ आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धस्थान शिर्डी आणि सप्तशृंगगड रेल्वे मार्गाने जोडली जातील. गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या ओझर येथील एचएएल कारखाना उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या कसबे सुकेणे रेल्वेस्थानकापासून ते ओझर मिगपर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा ब्रॉडगेज डिझेल इंजिन रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता. कारखाना उभारणीनंतर सदर मार्गावरील मालवाहतूक रेल्वेने बंद केली. वीस वर्षांपूर्वी या मार्गावरील लोखंडी रूळही काढून घेण्यात आले.
सदरचा रेल्वे मार्ग ओझर कार्गो विमानतळासाठी वापरात आणण्याचे प्रयत्न पाच वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले होते. एकीकडे नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी जमिनी मिळवण्यासाठी रेल्वेला आटोकाट प्रयत्न करावे लागत असताना दुसरीकडे मात्र जमीन ताब्यात असतानाही वापर होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक खासदार आणि जिल्ह्यातील उद्योजक व प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प दुर्लक्षित आहे. सध्या ताब्यात असलेल्या रेल्वेमार्गाच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याच्या
तक्रारी परिसरातून होत आहेत.
मध्य रेल्वेमार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानक ते ओझर हा मार्ग तयार असून, जमीन रेल्वेच्या ताब्यात
आहे.
ओझर-साकोरे-खेडगाव-वणी - बोरगाव-सापुतारा या केवळ ५० ते ५५ किलोमीटर अंतराचे नव्याने भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या खर्चात बचत
होईल. शिवाय दिंडोरी, नवसारी, सुरत, वापी, दमण या भागात मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने मालवाहतुकीला या मार्गाचा लाभ होईल. ओझर कार्गो विमान तळासाठीही या मार्गाचा वापर करण्याचे मध्यंतरी जिल्हा प्रशासन विचाराधीन होते. मात्र त्यासाठी योग्य ती पावले का
ुउचलली जात नाहीत हाच परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. (अपूर्ण)