माणुसकीच्या आधाराने केली आजारावर मात !
By Admin | Updated: March 24, 2016 23:14 IST2016-03-24T23:13:37+5:302016-03-24T23:14:04+5:30
मदतीचा हात : चिमुकलीला मिळाला सायकलीचा आधार

माणुसकीच्या आधाराने केली आजारावर मात !
लक्ष्मण सोनवणे ल्ल बेलगाव कुऱ्हे
आजच्या काळात माणुसकी लोप पावत असताना एका आर्थिक दुर्बल आदिवासी समाजाच्या चिमुकलीवर योग्य उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. आजारातून बरे झाल्यानंतर सुप्रियाला भेट म्हणून देण्यात आलेल्या सायकलीचा मोठा आधार झाला आहे.
घरात अठराविसे दारिद्र्य अन् मासेमारी करून जीवन कंठित असलेल्या नांदगाव बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सुप्रिया साहेबराव पवार हीस किडनीच्या भयंकर आजाराने ग्रासले होते. तिची मृत्यूशी चाललेली झुंज पाहून शाळेतील शिक्षकांनी तत्काळ माणुसकी जोपासत रोटरी क्लबचे ग्रामीण अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांना सदरची कल्पना दिली. त्यांनी सर्व आर्थिक जबाबदारी घेतली व रोटरी क्लब देवळालीच्या माध्यमातून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुप्रियाचे प्राण वाचले. तो आनंद व्यक्त करीत असताना तिला तालुक्यातून अनेकांनी मदतीचा हात दिला.
घोटी बु।। येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम दर्डा यांनी त्यांच्या नातीच्या बारशाप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत सुप्रियाला मदत म्हणून घरापासून शाळेपर्यंत येण्या-जाण्यासाठी सायकल भेट दिली. कावनई येथील कपिलधारा तीर्थावर आई वडिलांसोबत आलेल्या चिमुकलीला सायकल मिळाल्यामुळे ती भारावून गेली आणि तिला सायकलचा मोठा आधार मिळाला.