सापुतारा-वणी राज्य महामार्गावरील भलामोठा खड्डा ठरतोय जीवघेणा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:01 IST2020-10-24T22:20:14+5:302020-10-25T01:01:34+5:30
मृत्यूचा सापळा बनत असून जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्याच्या पोलीस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वणी ते सापुतारा राज्य महामार्गावरील भितबारी मधील खड्ड्यांचे मोजमाप करतांना घागबारी येथील सामाजिक कार्यकर्ते.
मृत्यूचा सापळा बनत असून जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्याच्या पोलीस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आतापर्यंत पाच ते सात युवकांना या खड्यांमुळे दूचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यापुर्वीही कुंदेवाडी येथील एका दुचाकीस्वाराचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाल्याचे घागबारी येथील पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी सांगितले.
या जागेवर उतार असल्याने उंबरपाडा कडील टोलनाका पार करून वाहने वेगात येतात. त्यामुळे खड्डा दुरवरुन चालकाच्या लक्षात येत नाही. वाहन अगदी जवळ आल्याने समोर खड्डा असल्याचे लक्षात येते. अशावेळी चालकांची धांदल उडून वाहनावरील नियंत्रण सुटते व चालक अपघातास बळी ठरतो किंवा गंभीर जखमी होतात.
यापुढे अपघात होऊ नये यासाठी महामार्गावर पडलेले हे मोठे खड्डे कायमस्वरूपी मजबूतीने बुजविण्याची मागणी घागबारी येथील पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तुळशीदास पिठे, लक्ष्मण गायकवाड, गुलाब गांगुर्डे, लक्ष्मण गायकवाड, चिंतामण गायकवाड आदींनी केली आहे.
यावेळी गांधीगीरी करत टेपने खड्ड्याचे मोजमाप घेतले असता जवळपास एक मीटर चौरस व अर्धा फुट खोलीचा हा खड्डा आहे. याचे माप महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
खड्डा कित्येकदा मातीने बुजविण्यात आला. मात्र रहदारीमुळे आठवडाभरातच माती निघून जाऊन मोकळा होतो. याच महामार्गावर सापुतारा पर्यंत खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या या महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची दुरुस्ती करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.