सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:10+5:302021-08-13T04:18:10+5:30
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता ...

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी कसरतीचे ठरणार आहे. मनासारख्या व नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी प्रवेशपात्रता निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजित केलेली सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांवरच गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यानुसारच अकरावीचे प्रवेश राबविले जाऊ शकतात. परंतु, अकरावीच्या ऑनलाइन अर्जाचा भाग-१ भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रियाही १६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक अकरावीच्या प्रवेशाविषयी चिंतित झाले असून आपल्याला जवळच्या व पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
---
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ९२२१०
अकरावीची प्रवेश क्षमता - २५,२७०
कोणत्या शाखेत किती जागा
कला -४९१०
वाणिज्य - ८६००
विज्ञान -१०१६०
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
----
आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची
अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय रद्द झाल्याने एसएससी, सीबीएसई, आसीएसईसह विविध मंडळांच्या दहावीच्या निकालानुसार गतवर्षाप्रमाणेच प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. परंतु, अद्याप अकरावी प्रवेशांविषयी राज्य सरकारचे कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
- के.आर. गीते, उपप्राचार्य केव्हीएन नाईक महाविद्यालय
विद्यार्थी चिंतेत
दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकन पद्धतीमुळे जाहीर करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने दहावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सीईटीच्या माध्यमातून पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू शकली असती. परंतु, आता चांगले टक्के असतानाही अपेक्षित महाविद्यालयातच प्रवेश मिळेल किंवा नाही, याची चिंता आहे.
- विलास जाधव, विद्यार्थी
--
सीईटी झाली असती तर नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली असती. परंतु, आता अंतर्गत मूल्यांकनात काही प्रमाणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने किमान प्रवेशाची प्रक्रिया तरी जलद गतीने राबविण्याची गरज आहे.
- सचिन कोकणे, विद्यार्थी