युती झाल्यास मनसेला किती जागा?

By Admin | Updated: January 31, 2017 00:29 IST2017-01-31T00:29:29+5:302017-01-31T00:29:46+5:30

चर्चेला उधाण : सेनेकडून बोळवण होण्याची मनसैनिकांना भीती

How much space does the MNS get in the coalition? | युती झाल्यास मनसेला किती जागा?

युती झाल्यास मनसेला किती जागा?

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यदाकदाचित सेना-मनसे यांच्यात युती झाल्यास मनसेच्या पारड्यात किती जागा पडतील, याबाबत गणिते मांडली जाऊ लागली आहेत. मात्र, मनसेने विनाअट युती करण्याचा पवित्रा घेतल्याने सेनेकडून नाशिकमध्ये ४० ते ४५ जागांवर बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.  शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय स्तरावर उलथापालथ होण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेचा जीव मुंबईत तर मनसेचा जीव नाशिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे, सेना-मनसेत युती झाल्यास प्रामुख्याने, मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी जागावाटपाबाबत पेच उद्भवणार आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-रिपाइं मिळून २२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच जागांवर सेना-मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागून आतापर्यंत पक्षाच्या २८ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील १७ नगरसेवकांनी तर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली असून, मनसेनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडे ८०० हून अधिक तर मनसेकडे ४७३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.  आता यदाकदाचित युतीची टाळी वाजलीच तर सेना-मनसे यांच्यात जागावाटप कशाप्रकारे होईल, या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसेने विनाअट युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेकडून सुमारे ८० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या पारड्यात ४० ते ४५ जागा टाकून बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांना आहे. मनसैनिकांमध्ये युती व्हावी याबाबत तीव्र इच्छा असली तरी शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: How much space does the MNS get in the coalition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.