दिवाळीत कोणी किती फटाके फोडले? पंचवटी परिसर शहरात सर्वांत पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:28 PM2021-11-17T16:28:16+5:302021-11-17T16:36:22+5:30

नाशिक - मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने फटाक्यांची आतषबाजी वाढल्याचे दिसून आले. परिणामी शहरातील ध्वनी आणि ...

How many firecrackers did someone set off on Diwali? Panchavati area at the forefront of the city! | दिवाळीत कोणी किती फटाके फोडले? पंचवटी परिसर शहरात सर्वांत पुढे!

दिवाळीत कोणी किती फटाके फोडले? पंचवटी परिसर शहरात सर्वांत पुढे!

googlenewsNext

नाशिक - मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने फटाक्यांची आतषबाजी वाढल्याचे दिसून आले. परिणामी शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषणात आठ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणींवरून समोर आली आहे. शहरात पंचवटी परिसरात ७९.९ डेसिबल आवाजाची नोंद झाली.

दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे शहरात दरवर्षी ध्वनी आणि वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. मात्र मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिकांनी कमी प्रमाणात फटाके फोडले होते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील घटले होते. यंदा निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाल्याने आणि कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने नागरिकांनी घराबाहेर पडत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणात देखील वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी पंचवटी परिसरात ७४.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती, यंदा त्यात वाढ होऊन ७९.९ डेसिबलची नोंद झाली आहे. शहरातील इतर भागांमध्येही प्रदूषण पातळी वाढल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यामुळे दमा व श्वसनाचे आजार असलेले नागरिक त्रस्त आहेत.

कोणत्या परिसरात किती प्रदूषण

ठिकाण--------आवाज (डेसिबल)

पंचवटी ---------७९.९

बिटको पॉईंट---७२.७

सीबीएस -------६३.९

प्रदूषित शहरांमध्ये नाशिकचा समावेश

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील २७ महापालिका क्षेत्रात १०२ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची निरीक्षणे नोंदवली. यामध्ये नाशिकचा समावेश राज्यातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. निरीक्षणांनुसार नाशिकमध्ये दिवसा ७५.२ तर रात्री ६८.२ डेसिबल ध्वनी प्रदूषणाची तीव्रता नोंदविण्यात आली.

यंदा फटाके फोडण्यात वाढ

मागील दिवाळी अनेक निर्बंध असल्याने नाशिककरांना कामाशिवाय घराबाहेर पडता येत नसल्याने फटाके कमी प्रमाणात फोडले गेले.

- यंदा निर्बंधांत शिथिलता आल्याने दिवाळी काळात नाशिककर मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे फटाके फोडण्यात वाढ झाल्याचे वाढत्या प्रदूषणावरून समोर आले आहे.

स्वत:ची अन् इतरांचीही काळजी घ्या....

दिवाळीत प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असते. फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात, जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. तसेच अस्थमा, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी होऊ शकते. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. दिलीप कांडेकर

फटाक्यांतून निघणारा धुर श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे श्वसन आणि फुप्फुसांच्या विकारांत वाढ होते. श्वासनलिका, फुप्फुस आणि दम्याच्या रुग्णांना फटाक्यांतील दूषित वायूंचा धोका अधिक असतो. त्यामुळे औषधे आणि उपचाराने नियंत्रणात आलेल्या आजारांची तिव्रता वाढू शकते.

- डॉ. शेखर महाले

Web Title: How many firecrackers did someone set off on Diwali? Panchavati area at the forefront of the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.