सेनापतीविना लढणे कसे शक्य?

By Admin | Updated: September 4, 2016 01:30 IST2016-09-04T01:29:25+5:302016-09-04T01:30:41+5:30

सेनापतीविना लढणे कसे शक्य?

How to fight without the commander? | सेनापतीविना लढणे कसे शक्य?

सेनापतीविना लढणे कसे शक्य?

किरण अग्रवाल

 

भुजबळ ‘आत’ असल्याच्या पार्श्वभूमीवर सेनापतीविना निवडणुका लढण्याची मानसिकता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली; पण ती करतानाच पक्ष सोडून जाऊ इच्छिणाऱ्यांना हिरवा झेंडा दाखविला गेल्याने, या पक्षातील व शीर्षस्थानी असलेल्या त्याच्या नेत्यांतील अगतिकता व अस्वस्थताच जणू उघड होऊन गेली आहे.

अलीकडील काही वर्षे नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही निर्णयाबद्दल पूर्णत: छगन भुजबळ यांच्यावर विसंबून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था आता त्यांच्याखेरीज आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायची वेळ आली म्हटल्यावर ‘टिक टिक वाजते डोक्यात’ अशी होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत सैरभैर झालेल्या व नेतृत्वहीन पक्ष कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी सेनापतीविना लढण्याची प्रेरणा देणेही ठीक आहे; पण मुळात सेनापती नसतानाच पक्षाचा शहर किल्लेदारही त्यासंदर्भात फारसा उत्सुक नसेल तर ‘ठाणे’दारही किती मजल मारणार, असा प्रश्न उपस्थित होणे अप्रस्तृत ठरू नये.
नाशिक शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या नाजूक अवस्थेतून वाटचाल करावी लागत आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर भुजबळांचे आगमन झाले तेव्हापासून हा पक्ष पूर्णपणे त्यांच्या मर्जीने मार्गक्रमण करीत होता. राजकारणातील मातब्बर नेते अशी ओळख असलेल्या तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आणि उपमुख्यमंत्री पदही भूषविलेल्या भुजबळांकडे जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे गेल्यानंतर स्थानिक पातळीवर होते नव्हते ते सारेच अन्य नेते जणू अडगळीत पडल्यासारखेच झाले होते. अधून मधून त्यातील काहींनी आपले अस्तित्व दाखवून देण्याचा लटका प्रयत्न केला खरा; परंतु वरिष्ठ पातळीवरून त्याला फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात भुजबळ एके भुजबळ अशीच स्थिती बनून राहिली. परिणामी, आता बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी खुद्द छगन भुजबळांना व त्यांचे पुतणे समीर यांनाही जेव्हा ‘आत’ जाण्याची वेळ आली तेव्हा येथल्या पक्षाचे सुकाणू कोणाच्या हाती सोपवायचे असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले होते. भुजबळांची सुटका लांबत चालल्याच्या व नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका आणि काही नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षाची निर्नायकी अवस्था संपवणे अगत्याचेही बनले होते. त्यादृष्टीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या खास मर्जितले म्हणविणाऱ्या तसेच जिल्ह्याशी निकटचा संबंध असण्याखेरीज भुजबळांप्रमाणेच ‘आक्रमक’ नेतृत्व म्हणूनही ओळख असणाऱ्या ठाणेकर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सूत्रे सोपविली गेली. त्यांनी दोनदा नाशिक दौरे करून व बैठका घेऊन गांगरलेल्या, हबकलेल्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांत नवीन उत्साह भरण्याचा प्रयत्नही करून झाला आहे. म्हणजे, एका दृष्टीने नवीन सेनापतींनी लंगड्या घोड्यावर मांड बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशात, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येऊन भुजबळ समर्थकांना गोंजारण्याचा भाग म्हणून ‘सेनापतीखेरीज लढण्याची’ भाषा केल्याने हा पक्ष व त्याचे काही नेते भुजबळांच्या प्रभाव मंडलाबाहेर पडायला तयार नसल्याचेच स्पष्ट होऊन गेले आहे.
इतके दिवस स्थानिक पक्ष संघटनेवर राहिलेले भुजबळांचे वर्चस्व पाहता, त्यांना डावलून एकदम नवीन भरारी घेणे कुणासही अवघड वाटणे समजून घेता येणारे आहे. पण, प्राप्त परिस्थितीत नाइलाज म्हणून का असेना; भुजबळांच्या ठायी असलेले अधिकार पक्षाध्यक्ष पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीच आव्हाड यांच्याकडे हस्तांतरित केले असताना, म्हणजे एक प्रकारे सेनापती म्हणून त्यांची नियुक्ती केली असतानाही पुन्हा प्रदेशाध्यक्षच जुन्या संदर्भाने ‘सेनापतीविना’चा राग आळवणार असतील तर पक्ष कार्यकर्त्यांत संभ्रमाची स्थिती निर्माण होणारच! विशेष म्हणजे, असे सांगताना तटकरे यांनी २००४च्या निवडणुकांसमयी शरद पवार दुर्धर आजारामुळे रुग्णालयात होते, तेव्हा पक्षाने सेनापतीविनाच लढून यश मिळविल्याचा दाखला दिला. मग तेव्हा करून दाखवले तर आता का नाही, असा त्यांचा प्रेरणात्मक सवाल होता. पण तसा तो करताना दोघी व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित कारणांची तुलना होऊ शकत नाही, याचा विचारच तटकरेंच्या मनाला शिवला नसावा. कारण, एक तर पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा जिल्हा म्हणून जसा खुद्द तटकरे यांनीच नाशिकचा गौरवपूर्ण उल्लेख केला तशी भुजबळांबाबतची स्थिती नाही. पवार काय अन् भुजबळ काय, कुणाच्याच पाठीशी संपूर्ण जिल्हा नाही, ही आजची वास्तविकता आहे. दुसरे म्हणजे, पवार हे आजारपणामुळे रुग्णालयात होते. भुजबळ ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी कारागृहात आहेत. रुग्णालयात असणे व गजाआड असणे यात काही फरक करणार की नाही? मग दोन्ही स्थितीत सहानुभूतीचाही फरक पडणे अगदी स्वाभाविक असताना तटकरे उगाच सेनापतीविना मैदानात उतरण्याचा मंत्र सैनिकांना देणार असतील तर कसे व्हायचे?
महत्त्वाचे म्हणजे, सेनापती कुणीही वा कसाही असो; तो सैन्याचे नेतृत्व करतो. तो ‘पडला’ की सैन्य माघारी वळते हा इतिहास आहे. येथे प्रदेशाध्यक्ष कारागृहात अडकलेल्या सेनापतीचा संदर्भ देत असताना त्याच सेनापतींच्या आदेशान्वये नाशिक शहराच्या किल्ल्याची सूत्रे स्वीकारलेल्या आमदार जयंत जाधव यांची मात्र ती जबाबदारी पार पाडण्याची मनोमन इच्छा नाही. तसे त्यांनी वेळोवेळी अनेकांजवळ व खुद्द प्रदेशाध्यक्षांकडेही बोलून दाखविले आहे म्हणे. अभ्यासपूर्वक एखादा प्रश्न मांडण्यात माहीर असलेल्या व आमदारकीच्या जबाबदारीतून वेळ काढू न शकणाऱ्या जाधव यांच्या या संदर्भातील अनिच्छेमुळेच तर शहराध्यक्ष बदलाच्या शक्यता व संकेतांची अजूनही चर्चा घडून येत असते. परंतु प्रदेशाध्यक्ष त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. आताही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी जो नाशिक दौरा केला, त्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याच्या हेतूनेच शहर व जिल्ह्याची वेगवेगळी बैठक घेतली गेली. परंतु कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी न देता दोन्ही बैठकांत तटकरे यांनी तेच ते मार्गदर्शन केले. त्यामुळे, वेगवेगळ्या बैठकांचा फार्स तरी का केला म्हणून कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली. यातही कडी म्हणजे, पक्षाचा पडता काळ दिसत असतानाही पक्ष सोडून जाणाऱ्यांनी
खुशाल व आताच चालते व्हावे म्हणून ठणकावले गेले. त्यामुळे सेनापतीविना व कार्यकर्त्यांविनाही राष्ट्रवादी कोणता व कसा यशाचा झेंडा रोवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: How to fight without the commander?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.