चार महिन्यांत ११ हजार घरकुले कशी बांधणार
By Admin | Updated: November 13, 2016 00:58 IST2016-11-13T00:52:11+5:302016-11-13T00:58:17+5:30
जिल्हा परिषदेपुढे पेच : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस?

चार महिन्यांत ११ हजार घरकुले कशी बांधणार
नाशिक : जिल्हा परिषदेला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोव्हेंबर सुरू होऊन एकाही घरकुलाचा ‘पाया’ रचला न गेल्याने विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा आहे.
विभागीय आयुक्तांच्या कारणे दाखवा नोटिसीच्या ‘बूस्टर डोस’ नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वीच जिल्ह्णातील सर्व शाखा अभियंता व उपअभियंता यांना आलटून-पालटून तालुक्यांमध्ये सर्वेक्षण व लाभार्थी तपासणीचे कामही दिले होते. ते सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थींची यादीही अंतिम करण्यात आल्याची चर्चा आहे.
जिल्ह्णात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात देण्यात आलेले आहे. या योजनेत पात्र लाभार्थींची निवड ही सामाजिक, आर्थिक आरक्षणाच्या यादीतून करण्यात येणार आहे. या ११ हजार ७५१ लाभार्थींपैकी सर्वाधिक लाभार्थी दिंडोरी तालुक्यात १२६७ तर सर्वात कमी लाभार्थी देवळा तालुक्यात ३७६ असल्याचे समजते. त्याखालोखाल कळवण ११४२, सुरगाणा १०७६ तसेच निफाड ४६७ व येवला ५०२ असल्याचे कळते. त्यातही अनूसूचित जमाती संवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी मिळत नसल्यानेच उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. मार्च २०१७ अखेर म्हणजेच चार महिन्यांत ही घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात असले तरी घरकुले बांधण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)