घरपट्टी वसुलीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट
By Admin | Updated: March 31, 2017 23:25 IST2017-03-31T23:24:54+5:302017-03-31T23:25:17+5:30
नाशिक : राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य दिले होते, घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढ झाली,

घरपट्टी वसुलीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट
नाशिक : राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य दिले होते, परंतु ३१ मार्चअखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार घरपट्टी वसुलीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढ झाली, तर पाणीपट्टीत मात्र सुमारे दहा कोटींनी घट झाली आहे. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ११६ कोटी रुपये घरपट्टी, तर ४०.२६ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. चालू आर्थिक वर्षात महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रचंड झगडावे लागले आहे. यंदा अगोदर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, नंतर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक या कामकाजात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे कर्मचारी गुंतलेले होते. त्यामुळे महापालिकेला वसुलीत अडथळे निर्माण होत गेले. तरीही नोटाबंदीचा फायदा झाल्याने महापालिकेला त्यातून सुमारे १८ कोटी रुपये वाट्याला आले होते. त्यानंतर शासनानेच कठोर पावले उचलत घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्याचे निर्देश दिले व त्यावर आयुक्तांचा केआरए निश्चित केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्तांनी थकबाकी वसुलीसाठी अभियानच हाती घेण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, महापालिकेने ‘ढोल बजाओ मोहीम’ राबविण्यास सुरुवात केली, परंतु सुरुवातीचा उत्साह नंतर आटला आणि वसुलीही अपेक्षेपेक्षा घटली. ३१ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार घरपट्टी ९०.३७ कोटी रुपये, तर पाणीपट्टी ३० कोटी रुपये वसूल झाली. मागील वर्षी घरपट्टी ८४ कोटी, तर पाणीपट्टी ४० कोटी रुपये वसूल झाली होती.
पाणीपट्टीची बिले वाटप
निवडणुकीच्या कामकाजात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कर्मचारी गुंतल्याने महापालिकेला गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून पाणीपट्टीची बिलेच वाटप करता आलेली नाही. त्यामुळे यंदा पाणीपट्टीच्या उत्पन्नात घट झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महापालिकेने आता दोन दिवसांपासून पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.