आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घर
By Admin | Updated: April 15, 2017 01:41 IST2017-04-15T01:40:13+5:302017-04-15T01:41:00+5:30
आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घरसुभाष भामरे : आडगाव येथे घरकुल योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांनी फिरविली पाठ

आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घर
नाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती होत आहे. या माध्यमातून देशातील गरिबांना हक्काची घरे मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हेतू साध्य होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.
आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूललगतच्या मोकळ्या भूखंडावर म्हाडातर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या ४४८ सदनिकांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायीसमिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक उद्धव निमसे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदि उपस्थित होते.
या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात म्हाडाचे भूमिपूजनाचा घाट घातल्यामुळे प्रकल्पस्थळाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह दंगा नियंत्रण पथक व शिघ्रकृती दलाचे पथकही कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आल्याने गावकऱ्यांनी निदर्शने न करता शांततेच्या मार्गाने भामरे यांना निवेदन देत प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याने प्रशासकीय अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते वगळता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. म्हाडाचे नाशिक मंडळ मुख्य अधिकारी रमेश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. पोद्दार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)