नाशिक : चिक्की घोटाळ्याचा पंकजा मुंडेंवर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची तुलना ग्रामविकास व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रामायणातल्या बिभीषणशी केली असून, प्रभु रामचंद्रांना बिभीषणने रावणाविरोधात मदत केली तरी त्यांना कोणीही चांगले म्हटले नाही. शेवटी आजही लोक घर का भेदी लंका ढाए,असेच म्हणतात. मलाही रक्ताच्या नात्याची मदत होण्यापेक्षा त्रासच जास्त झाला,असे धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर पलटवार केला.नाशिक येथील व्ही.एन. शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिल्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता समाचार घेतला. आपल्याला राजकारणात अजिबात यायचे नव्हते. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला नेमके कोणाला सोपवायचे, याबाबत विचार करून काहींच्या ताब्यात त्यांना सोपविले. मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यावेळी त्यांनी मला तुलाच आता यांना सांभाळायचे आहे, असे सांगितले होते. आपल्याला मुंडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी चुकले तर मला सांभाळा आणि चांगले काम केले तर कौतुक करा, असे सांगताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. आज सत्तेत असूनही आपल्यावर संघर्ष करण्याची वेळ आली. आपण आयुष्यभर सतत संघर्षच करीत राहणार आहोत. आपल्याला कोणत्याही लाल दिव्याचे आणि कोणतीही उंच खुर्ची नको आहे. बिभीषणने श्रीराम यांना मदत केली, मात्र आजही लोक बिभीषणला चांगले म्हणत नाही. घर का भेदी लंका ढाए, असेच लोक म्हणतात. कर्णाने दुर्योधनाला मदत केली. तरी कर्णाचे नाव लोक आजही चांगलेच घेतात. मी रक्ताच्या नात्या-गोत्यांपासून आता दूरझाले आहे. कधी कधी संन्यास घेण्याचा विचारही मनात डोकावयाचा मात्र मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्यामुळे माझ्यावरही तितकेच प्रेम करणाऱ्या जनतेसाठी आपण राजकारणात संघर्ष करण्यास सिद्ध झालो आहोत. मी जेव्हा अडचणीत होते, त्यावेळी रक्ताच्या नात्यातील लोकांनी मदत सोडाच, अडचणीत आणले. तेव्हा मुंडेयांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेनेच आपल्याला धीर दिला. स्वत:च्या स्वार्थापोटी घरटे सोडून दुसऱ्याच्या महालासमोर ही माणसे बसली. त्यांना समाज माफ करणार नाही. राजकारणात पदे मिळविणाऱ्यांना भविष्य नसते, असे त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टोला हाणला. (प्रतिनिधी)
घर का भेदी लंका ढाए
By admin | Updated: August 25, 2015 00:04 IST