लक्ष्मीपूजनासाठी घरोघरी उत्साह

By Admin | Updated: November 10, 2015 22:54 IST2015-11-10T22:53:23+5:302015-11-10T22:54:20+5:30

आज सोहळा : पूजासाहित्याच्या खरेदीसाठी गर्दी

House enthusiasm for Lakshmi worship | लक्ष्मीपूजनासाठी घरोघरी उत्साह

लक्ष्मीपूजनासाठी घरोघरी उत्साह

नाशिक दीपोत्सवात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या लक्ष्मीपूजनाची नाशिककरांची तयारी पूर्ण झाली असून, उद्या (दि. ११) सायंकाळी घरोघरी तथा व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये भक्तिभावात, पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन केले जाईल. या पार्श्वभूमीवर शहरातील मंगळवारी दिवसभर बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.
यंदा दिवाळीतील सर्वच सण वेगवेगळ्या दिवशी आले असून, त्यामुळे आबालवृद्धांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आज नरक चतुर्दशी उत्साहात साजरी झाली. श्रीकृष्णाने नरकासुराचा याच दिवशी वध केल्याची आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने प्रथेनुसार पहाटे सूर्योदयापूर्वीच शरीराला तेल, उटणे लावून पुरुष मंडळींनी गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
उद्या (दि. ११) सायंकाळी घरोघरी लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाईल. व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या यंत्रसाहित्याचेही पूजन केले जाईल. लक्ष्मीची मूर्ती, हिशेबाच्या वह्या, सोन्या-चांदीची नाणी, केरसुणीचे मनोभावे पूजन केले जाणार असून, व्यापारीवर्गाचे या दिवसापासूनच हिशेबाचे नवे वर्ष सुरू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. लाह्या, बत्तासे, धने, गूळ, हळद-कुंकू, अष्टगंध, फुले, कापूर, अत्तर, विड्याची पाने, फळे, नारळ, सुपारी, खारीक, खोबरे आदि लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार कारंजा परिसरात नागरिकांची गर्दी उसळली होती. मेनरोड, शालिमार, महात्मा गांधी रोडवरही खरेदीची धूम होती. कपडे, फटाका स्टॉल्स, भेटवस्तूंची दुकाने, मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत होती़ (प्रतिनिधी)

Web Title: House enthusiasm for Lakshmi worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.