पाण्यासाठी येवला तहसील कार्यालयात तासभर ठिय्या
By Admin | Updated: June 8, 2016 22:33 IST2016-06-08T22:31:06+5:302016-06-08T22:33:24+5:30
दखल : दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

पाण्यासाठी येवला तहसील कार्यालयात तासभर ठिय्या
येवला : कानडी गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटोदा शिवारात असलेली कानडी ग्रामपंचायतीची विहीर खोलीकरण करण्यासाठी होणाऱ्या पाटोदा गावच्या काही ग्रामस्थांनी केलेल्या विरोधात प्रशासनाने हस्तक्षेप करून विहीर खोलीकरणाचा मार्ग मोकळा करावा, असा आग्रह कानडी गावच्या महिलांनी धरला आणि तहसील आवारात ५५ महिलांनी आपल्या हंड्यांसह सुमारे तासभर ठिय्या मांडला.
हंडा नाद केल्याने संपूर्ण तहसील आवाराचे लक्ष या महिलांनी वेधून घेतले होते. आम्हाला टॅँकरचे पाणी पुरत नाही. आमच्या हक्काच्या विहिरीचे खोलीकरण करू द्या, अशी मागणी करीत थेट तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि निवेदनही दिले. आम्ही २४ किलोमीटरवरून आलो, आमचा प्रश्न सोडवा, अशी आग्रही भूमिका महिलांनी घेतली.
दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार शरद मंडलिक व गटविकास अधिकारी सुनील आहिरे हे दोन दिवसात कानडी गावचा पाणीपुरवठा करणाऱ्या या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महिलांना मिळाल्याने प्रश्न मार्गी लागणार या आशेने त्या महिला परतल्या.
येवला पंचायत समितीच्या वतीने कानडी गावाला टँँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी पाण्याची तहान भागात नाही, असे कानडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शोभा उशीर, रेखा हारपडे, पुष्पा दौंड, अलका हिरे, चांगुणा काळे, पुष्पा होल्गर,
राधिका डमाळे, चंद्रकला खुरचणे, चंद्रकला झेंडे, सुनीता झेंडे,
पर्वताबाई बोडके, आशा खुरचणे, निर्मला काळे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय अहेर, परसराम गुंजाळ,
मोहन काळे, योगेश हारपडे, संजय काळे, रवींद्र उशीर, सुभाष काळे यांच्यासह महिलांनी चर्चेत भाग
घेत आपली व्यथा मांडली.
(वार्ताहर)