रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा
By Admin | Updated: October 21, 2014 02:00 IST2014-10-20T00:41:30+5:302014-10-21T02:00:41+5:30
रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा
नाशिक : भाजपा सोबत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निर्णय रिपब्लिकन जनतेला फारसा रुचलेला नसल्याचे आणि भाजपानेही रिपाइंला प्रचारापासून दूरच ठेवणे पसंत केल्यामुळे आचार, विचार आणि संस्कारात भाजपा व रिपाइंत मोठी दरी असल्याचे लपून राहिलेले नाही. या निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसूनही आले. त्यामुळे महायुतीत रिपाइं कार्यकर्त्यांची घुसमट होणे ही रिपाइंला धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
आघाडी व युतीच्या फाटाफुटीनंतर सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, रिपाइंमध्ये मात्र निवडणूक लढण्याची ऊर्जा दिसून आली नाही. एवढेच नाही, तर भाजपा या मित्रपक्षानेही रिपाइंला बाजूलाच ठेवल्यामुळे ‘ढाण्या वाघ’ अशी गर्जना करणाऱ्या रिपाइंची अवस्था केविलवाण्या मांजरीसारखी आहे, हे कटूसत्य रिपाइंला स्वीकारावेच लागणार आहे.
भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिपाइंने राज्यातील ज्या आठ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये देवळाली मतदारसंघाच्या जागेचाही समावेश होता. याच जागेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीदेखील पक्षाचा उमेदवार उभा करून रिपाइंचे अस्तित्व नाकारले होते. भाजपाचा निर्णय योग्य होता हे मतमोजणीनंतर समोर आले आहेच. रिपाइंने खेड्यापाड्यात जाळे विणले असल्याचे आणि रामदास आठवले यांना मानणारा वर्ग असल्याचे बोलले जात असले, तरी रिपाइंच्या प्रकाश लोंढे यांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागला. ठाम राजकीय भूमिका नसल्याने निवडणुकीच्या धामधुमीतही कार्यकर्त्यांना मरगळ आल्याने रिपाइंची ही अस्वस्था त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यापासून संघटनेने बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.