मनपा रुग्णालयांमध्ये औषधाविना रुग्णांचे हाल
By Admin | Updated: July 26, 2014 00:53 IST2014-07-25T22:19:57+5:302014-07-26T00:53:41+5:30
मनपा रुग्णालयांमध्ये औषधाविना रुग्णांचे हाल

मनपा रुग्णालयांमध्ये औषधाविना रुग्णांचे हाल
मालेगाव : येथील महानगरपालिका औषध ठेकेदाराची दिरंगाई आणि प्रशासनाची तथाकथित तांत्रिक कारणे यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रकारच्या १८५ औषधांची खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित आजाराच्या रुग्णांना औषधाविना परतावे लागत असून, खासगी औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करावे लागत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
येथील मनपाचे वाडीया व अली अकबर हे दोन प्रमुख रुग्णालये, कॅम्प दवाखाना व प्रसूतिगृह आणि नऊ नागरी आरोग्यकेंद्रे आहेत. या रुग्णालयातील व प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रातील संबंधित आजारांवरील औषधसाठा संपुष्टात आल्यानंतर मनपा प्रशासनातर्फे यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा प्रक्रियेनुसार मनपाच्या एका नियमित औषध ठेकेदाराची त्यासाठी निवड करण्यात आली. मात्र ८० लक्षहून अधिक रकमेच्या या औषध पुरवठ्यासाठी संबंधित ठेकेदाराने दाखल केलेल्या किमान किमती-विषयीचा मुद्दा पुढे आला. आधीच्या औषधांच्या किमती व आताच्या औषधांच्या किमती यांच्यात तफावत असल्याच्या आरोपातून या निविदा ठेक्याची प्रक्रिया खोळंबली. आरोग्य प्रशासन व स्थायी समितीकडून यासंदर्भात औषधविक्रेत्या कंपनीच्या दरपत्रकाची मागणी करण्यात आली. त्यानंतर मनपाच्या स्थायी समिती बैठकीतही दोन - तीनदा चर्चा झाली. मात्र याविषयी समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून मनपा औषध खरेदीचा ठेका त्रांगड्यात अडकला आहे. त्याचा फटका विविध आजारांचा रुग्णांना होत आहे.
मध्यंतरी अत्यावश्यक शिल्लक साठ्यातील औषधे संपुष्टात आल्याने नाशिकहून तातडीने औषधे आणण्यात आली होती. त्यानंतरही मनपाची औषध खरेदीप्रक्रिया सुरळीत होऊ शकलेली नाही.