कामवाटप समितीचे ‘वराती मागून घोडे’
By Admin | Updated: March 10, 2017 01:40 IST2017-03-10T01:39:13+5:302017-03-10T01:40:46+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीचे अनेक अजब किस्से आजवर उघड झालेले असताना आता तर कामवाटप समितीच्या कारभाराचा अजब नमुनाच उघड झाला आहे

कामवाटप समितीचे ‘वराती मागून घोडे’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीचे अनेक अजब किस्से आजवर उघड झालेले असताना आता तर कामवाटप समितीच्या कारभाराचा अजब नमुनाच उघड झाला आहे. येत्या १५ मार्च रोजी होणाऱ्या काम वाटप समितीच्या बैठकीचे पत्र संबंधित कार्यकारी अभियंता यांना चक्क १५ मार्चची तारीख टाकूनच ९ मार्चला देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कामवाटप समितीच्या बैठकीविषयी ठरविलेल्या तारखेची मंजूर टिपणीचा उल्लेखही कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात नसल्याने खरोखर अशी काही बैठक झाली काय, याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.
कामांचे नियोजन तातडीने होण्याच्या दृष्टीने मार्च महिन्याची कामवाटप बैठक १५ मार्च २०१७ ला सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता एकच्या दालनात आयोजित करण्यात आल्याबाबतचे पत्र बांधकाम विभागाच्या तीनही, लघुपाटबंधारे विभागाच्या दोन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याला १५ मार्च २०१७ च्या तारखेचे पाठविण्यात आलेले आहे. १५ मार्चला कामवाटप समितीची बैठक असताना चक्क १५ मार्चच्या तारखेचेच पत्र कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेले आहे. या पत्रात म्हटले आहे की, तसेच ज्या बांधकाम व लघुपाटबंधारे विभागास नियमित कामवाटप समितीनंतर अतिरिक्त कामवाटप समितीची बैठक घेऊन कामे वाटप करावयाची असल्यास त्यांनी बांधकाम विभाग एककडे कामांची यादी पाठवावी, त्यानंतर कामवाटप समितीची बैठक लावण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. हे पत्र देतांना त्याबाबत कामवाटप समितीच्या अध्यक्षांच्या बैठकीचा जो संदर्भ देण्यात आला आहे त्या मंजूर टिपणीची तारीखही नाही. त्यामुळे या पत्राबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
(प्रतिनिधी)