रब्बीच्या आशा पल्लवित

By Admin | Updated: September 26, 2016 00:30 IST2016-09-26T00:29:51+5:302016-09-26T00:30:19+5:30

सुकाळ : भालूर, लोहशिंगवे, लक्ष्मीनगर बंधारे भरून वाहू लागले

The hope of Rabbi throws up | रब्बीच्या आशा पल्लवित

रब्बीच्या आशा पल्लवित

मनमाड : भालूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने भालूरसह लक्ष्मीनगर व लोहशिंगवे येथील बंधारे भरून वाहू लागले आहेत. या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहे.
परिसरात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजरीची जागा मक्याने घेतली आहे. बऱ्यापैकी निघणारे उत्पादन व बाजारभावामुळे खरिपामध्ये मक्याचे पीक फायदेशीर ठरत आहे.
दरवर्षीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव या वर्षीही शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावली असली तरी नंतर महिनाभर दडी मारली होती. श्रावण महिन्यातही समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने निदान पोळ्याच्या दिवशी तरी पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती; मात्र ती फोल ठरली. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भालूर परिसरात अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपाचे पीक बऱ्यापैकी आले. तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या पावसामुळे भालूर, लोहशिंगवे व लक्ष्मीनगर या बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रब्बी हंगामामध्ये परिसरात गहू, हरबरा, उन्हाळ व रांगडा कांदा ही पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. परिसरात असलेल्या भालूर, लोहशिंगवे या गावांमधील बंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्याच्या आवर्तनाची रब्बी हंगामास मदत होत असते. दमदार पावसाच्या हजेरीमुळे दुष्काळ संपुष्टात आला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
भालूर येथे पिकांचे नुकसान
भालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या पावसाने खरिपाला जीवदान मिळाले होते; मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दुष्काळ संपुष्टात आला असला तरी काही ठिकाणी खरिपाचे पीक वाया जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. अनेक ठिकाणी सोंगून ठेवलेल्या बाजऱ्या व मका भिजून नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी तुंबल्याने पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे भूगर्भातील पातळीत वाढ झाल्याने रब्बी हंगाम चांगला निघणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 

Web Title: The hope of Rabbi throws up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.