पुरेसे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित
By Admin | Updated: August 26, 2016 23:48 IST2016-08-26T23:48:15+5:302016-08-26T23:48:31+5:30
दोन जलकुंभ : प्रभाग ५२ चा पाणीप्रश्न मिटणार; काही दिवस प्रतीक्षा कायम

पुरेसे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित
पाथर्र्डी फाटा : गेल्या दीड दशकापासून डोकेदुखी ठरलेला प्रभाग क्रमांक ५२ चा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. या भागासाठी अधिकच्या दोन जलकुंभांचे कार्यादेश निघाल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे. पाणीप्रश्नासाठी येथील महिलांना वारंवार आंदोलन करावे लागले होते.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत पाथर्र्डी फाटा परिसर विकसित झालेला आहे. नागरीवस्ती प्रचंड वाढली मात्र पाणीपुरवठ्याचे नियोजन न झाल्याने रहिवाशांना पुरेसे व वेळेवर पाणी मिळत नाही. रात्री कधीही कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे कित्येकदा महिलांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. वासननगर, प्रशांतनगर, पोलीस वसाहत, दाढेगाव, वडनेरगेट, जाधववाडी आदि भागात पाणीपुरवठ्याची समस्या आहे. वासननगर आणि प्रशांतनगरला रात्री एक वाजता पाणीपुरवठा होतो आणि तोही कमी दाबाने.
माजी नगरसेवक संजय नवले यांनी या ठिकाणी दोन जलकुंभ मंजूर करून घेतले होते; मात्र त्यांच्या कार्यकाळात जलकुंभांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वी आनंदनगर येथील नवीन जलकुंभ सुरू झाला. पाथर्डी फाटा येथील जलकुंभाचे नूतनीकरण करून पाण्याची वेळ बदलविण्यात आली होती; मात्र आता नवीन दोन जलकुंभ मिळणार असल्याने महिलावर्गाने समाधान व्यक्त केले आहे; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होण्यास वर्षभराचा काळ लोटणार आहे.
सध्या या भागाला फाळके स्मारक व पाथर्र्डी फाटा येथील दोन जलकुंभ, आनंदनगर व भवानीमाथा येथील वीस लाख लिटर क्षमतेचे दोन अशा चार जलकुंभांमधून पाणीपुरवठा होतो. आणखी दोन जलकुंभ झाल्यास पाणीप्रश्न कायमचा सुटेल. अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)