गृहविलगीकरण रुग्णांसाठी स्वखर्चाने चालविली ‘ऑक्सिमीटर बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:40+5:302021-06-05T04:11:40+5:30
नाशिक : एप्रिल-मे महिन्याचा काळ काेरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला होता. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने बेड मिळणेही ...

गृहविलगीकरण रुग्णांसाठी स्वखर्चाने चालविली ‘ऑक्सिमीटर बँक’
नाशिक : एप्रिल-मे महिन्याचा काळ काेरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला होता. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने बेड मिळणेही मुश्कील झाले होते. अनेकांना नाइलाजास्तव घरीच ठेवण्याची वेळ आली तर काहींना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात रहावे लागले. अशा रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासण्याची नितांत आवश्यकता असते; मात्र हे सर्वसामान्यांना माहीत नसल्याने अशा रुग्णांसाठी एका आरोग्यसेवकाने स्वखर्चाने ‘ऑक्सिमीटर बँक’ सुरू केली आणि त्यांना घरपोच ऑक्सिमीटर पुरविले.
महापालिकेच्या सेवेत असलेले बुधवार पेठ येथील प्रवीण वाघ यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक काेरोना रुग्णांना स्वत: रुग्णालयांपर्यंत पोहोचविले आहे. दुसऱ्या लाटेतही त्यांनी आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली आणि गृहविलगीकरणात असलेल्यांसाठी मोफत ऑक्सिमीटर उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविला. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात होते. अशा रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल सातत्याने तपासावी लागते. परंतु हे सर्वांनाच माहिती असते असे नाही. ज्यांना माहिती आहे असे ते ऑक्सिमीटर विकत घेतातही; परंतु ज्यांना हे शक्य नाही किंवा त्यांना त्याबाबतची पुरेशी माहिती नाही अशा रुग्णांसाठी वाघ यांनी ‘ऑक्सिमीटर बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी स्वत: सुरुवातीला दहा ऑक्सिमीटर विकत घेतले आणि गृहविलगीकरणातील रुग्णांना ऑक्सिमीटर पुरविण्यास सुरुवात केली. त्यांचा हा उपक्रम अनेकांना माहीत झाल्याने त्यांना इतर लोक संपर्क करून ऑक्सिमीटरची मागणी करू लागले. उपलब्धतेनुसार त्यांनी रुग्णांना ऑक्सिमीटर पुरविण्यास सुरुवात केली. १४ दिवसांसाठी मोफत ऑक्सिमीटर अनेक रुग्णांपर्यंत त्यांनी पोहोचविले. त्यांच्या या माेहिमेत नंतर अनेकांनी सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना ऑक्सिमीटर भेट दिले. सद्य:स्थितीत त्यांच्याकडे ७५ ऑक्सिमीटर असून, ते अजूनही गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी सेवा देत आहेत.
--काेट--
बाधित रुग्णांना ऑक्सिमीटरची गरज असते, त्यामुळे मुलीच्या वाढदिवसाला इतर खर्च टाळून दहा ऑक्सिमीटर खरेदी केले. रुग्णांना याची गरज असते; परंतु त्यांना याबाबतची माहिती नसते, अशा रुग्णांपर्यंत ऑक्सिमीटर पोहोचून त्यांना दिलासा दिला. सुरुवातील स्वत; खर्च करून ऑक्सिमीटर बँक सुरू केली. त्यानंतर अनेक लोक या मोहिमेत सहभागी झाले. आजही ही सेवा अविरत सुरू आहे.
- प्रवीण वाघ, आरोग्यसेवक
===Photopath===
030621\382803nsk_44_03062021_13.jpg
===Caption===
प्रविण वाघ, आरोग्यसेवक