म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आता घरोघरी शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:40+5:302021-05-30T04:12:40+5:30
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाने समन्वय कक्ष तयार केला असून, त्याद्वारे दररोज सापडणारे रुग्ण, त्यांच्यावर केले जात असलेले ...

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आता घरोघरी शोध
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाने समन्वय कक्ष तयार केला असून, त्याद्वारे दररोज सापडणारे रुग्ण, त्यांच्यावर केले जात असलेले उपचार व शस्त्रक्रिया, तसेच मृत्यूचे प्रमाण यावर हा कक्ष लक्ष ठेवून असून, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणारे ॲम्फोटेरेसिन-बी औषधांच्या वाटपावरही नियंत्रण ठेवले जात आहे. असे असले तरी, गेल्या दहा दिवसांत रुग्णांचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला चिंता भेडसावू लागली आहे. त्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार व दक्षता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून ज्या रुग्णांनी डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेतले आहेत, अशा रुग्णांची माहिती या मोहिमेत गोळा केली जात आहे. त्यात मधुमेही कोरोना रुग्ण व ज्यांनी सात दिवसांहून अधिक दिवस उपचार घेतले आहेत, तसेच आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण, कोरोना उपचारादरम्यान ज्यांनी स्टेरॉइड व ऑक्सिजन थेरेपी घेतली, अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यात म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत किंवा नाही, याची खात्री केली जात आहे. असे रुग्ण सापडल्यास ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी भरती केले जाणार आहेत.
चौकट===
अशी असतील लक्षणे
* नाक चोंदणे, नाकातून लालस्त्राव येणे, नाकाच्या, चेहऱ्याच्या एका गालाच्या बाजूला सूज येणे, वेदना होणे.
* डोळे लाल होणे, डोळ्यांभोवती वेदना होऊन सूज येणे, तीव्र डोकेदुखी होणे, दृष्टी कमी होणे.
* दात, हिरड्या दुखणे, दात हलणे, पू येणे.