मुक्त विद्यापीठाच्या सहायक पद भरतीत गोलमाल वशिलेबाजीचा गंध : व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली
By Admin | Updated: May 5, 2014 20:01 IST2014-05-05T19:26:11+5:302014-05-05T20:01:54+5:30
(वृत्त मालिका)

मुक्त विद्यापीठाच्या सहायक पद भरतीत गोलमाल वशिलेबाजीचा गंध : व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली
(वृत्त मालिका)
सतीश डोंगरे, नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गैरव्यवहाराचे एकापाठोपाठ एक प्रकार समोर येत असतानाच, परीक्षा विभागाच्या सहायक पद भरतीत गोलमाल झाल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली देत करारावरील १७ कर्मचार्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर घेण्याचा घाट घातला जात असून, या प्रकरणाला वशिलेबाजीचा गंध येत आहे.
२००८-०९ मध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सहायक म्हणून करार तत्त्वावर १७ कर्मचार्यांना घेण्यात आले होते. यावेळी व्यवस्थापन मंडळाच्या नियमानुसार या कर्मचार्यांकडून रीतसर हमीपत्र लिहून घेण्यात आले असून, हमीपत्रानुसार दर सहा महिन्याने पुनर्करार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार तीन वर्षांनंतर सेवेतून कमी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र विद्यापीठाने सर्व नियम धाब्यावर बसवून या कर्मचार्यांना आतापर्यंत सेवेत कायम ठेवले आहे. वास्तविक या सर्व कर्मचार्यांचा २०१२ मध्येच सेवेचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु तरीदेखील विद्यापीठाने सर्व कर्मचार्यांचा सहा महिन्यांचा करार वाढवून देत व्यवस्थापन मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
विशेष म्हणजे, आता विद्यापीठ या सर्व १७ कर्मचार्यांना कुठलीही जाहिरात न देता कायमस्वरूपी करणार असल्याने या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची देवाण-घेवाण झाली असल्याची चर्चा आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आला असून, यामध्ये सर्व १७ कर्मचार्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर विद्यापीठात रुजू करण्याचे नमूद केले आहे; तर उर्वरित सहायकांची ३३ पदे भरताना मागासवर्गीयांकरिता शासनाने विहित केलेल्या आरक्षण धोरणाप्रमाणेच पदे भरावीत, असे अध्यादेशात नमूद केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून विद्यापीठात कनिष्ठ सहायक पदावर काम करणार्या ३३ कर्मचार्यांबाबत विद्यापीठाकडून असा दुजाभाव केला जात असल्याने यामागे नेमके गौडबंगाल आहे तरी काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या १७ कर्मचार्यांमधील बहुतेक कर्मचारी हे विद्यापीठातील बड्या अधिकार्यांचे नातेवाइक असल्यानेच हा सर्व घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. त्याकरिता २६ मार्च २०१४ मध्ये झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या सर्व कर्मचार्यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावदेखील मांडण्यात आला असून, त्यावर कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उर्वरित ३३ कनिष्ठ सहायकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वीस वर्षांपासून सेवेत असलेल्यांना डावलून १७ कर्मचार्यांनाच सहायक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे कारण तरी काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
-------
इन्फो
परीक्षेचे कारण
परीक्षा विभागात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे परीक्षाविषयक कामे करण्यासाठी सहायकांची आवश्यकता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मे मध्ये होणार असल्याने सहायकांच्या सेवा न घेतल्यास परीक्षाविषयक कामे करण्यास अडचणी येऊ शकतात. विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व त्यानुसार वाढलेली परीक्षार्थींची संख्या यामुळेच सहायकांना सहा महिन्यांसाठी करारावर नेमणूक देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचा निर्वाळा विद्यापीठाने दिला आहे. मात्र २०१३ मध्येच सेवेचा कालावधी (तीन वर्षे) पूर्ण झालेला असताना, करारात मुदतवाढ देण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.