‘फ्रावशी’सह बहुतांश शाळांना सुटी
By Admin | Updated: October 10, 2016 02:08 IST2016-10-10T02:03:56+5:302016-10-10T02:08:48+5:30
जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता : परिस्थितीनुसार मुख्याध्यापकांनी द्यावी सुटी

‘फ्रावशी’सह बहुतांश शाळांना सुटी
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात सर्वत्र संतापाचा आगडोंब उसळल्याने तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. यामुळे फ्रावशी इंटरनॅशनल शाळा, अंबडमधील ग्लोबल व्हिजन स्कूल, इंदिरानगरची नाशिक केंब्रिज स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जेएमसीटी शाळा व कॉलेजच्या व्यवस्थापनाने अधिकृतरीत्या सुटी जाहीर केली आहे. यासह विविध खासगी व सरकारी शाळांनाही सुटी राहणार असल्याचे वृत्त आहे.
विविध ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आणि बसेस व पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळांना सुटी द्यावी, अशी सूचना शिक्षण मंडळ प्रशासनाधिकऱ्यांनी दिली आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध खासगी आणि सरकारी शाळा सोमवारी (दि. १०)बंद राहण्याची शक्यता आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडत असल्याने शाळास्तरावर मुख्याध्याकपकांडून शाळांना सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.
रविवारची सुटी आणि संतापाचा उद्रेक व त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये सोमवारी शाळांची घंटा वाजणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मुख्याध्यापकांना सुटी देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आल्याचे सांगितले.