सोनगाव येथे राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी
By Admin | Updated: July 3, 2017 00:22 IST2017-07-03T00:22:15+5:302017-07-03T00:22:46+5:30
सायखेडा : फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ सोनगाव (ता. निफाड) येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

सोनगाव येथे राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ सोनगाव (ता. निफाड) येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय कारे यांनी सर्व सभासदांना राज्य शासनाचा जीआर वाचून दाखविला. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे पाच टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. अध्यादेश हा पूर्णत: फसवा असून, शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे. यावेळी नागरिकांनी शासन अध्यादेशाची होळी केली.
संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत कर्ज न भरण्याची शपथ घेतली. यावेळी चंद्रकांत गावले यांनी सांगितले, शासनाच्या चुकीच्या जीआरमुळे कुटुंबात व नवरा बायकोत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी. या योजनेंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेली मुद्दल आणि व्याज असे मिळून दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे; ज्या शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम भरण्याची परिस्थिती नसेल, तो या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे कुठलेही निकष न लावता सरसकट ३० जून २०१७ पर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी बाजार समिती संचालक विजय कारे, कदम, विष्णुगिरी गोसावी, संजय कांडेकर, सुभाष कारे, चंद्रकांत गावले, विनायक खालकर, बाळासाहेब कांडेकर, संपतराव गावले, सोमनाथ जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.