‘होळी रे होळी’चा उद्घोष
By Admin | Updated: March 6, 2015 01:30 IST2015-03-06T01:28:50+5:302015-03-06T01:30:40+5:30
‘होळी रे होळी’चा उद्घोष

‘होळी रे होळी’चा उद्घोष
नाशिक : गोवऱ्यांचे उंचच उंच थर... त्यांना केलेली आकर्षक सजावट... ‘होळी रे होळी’चा उद्घोष आणि भक्तिभावाने केले जाणारे पूजन... अशा पारंपरिक उत्साहात होळीचा सण साजरा झाला. विशेषत: जुने नाशिक, पंचवटी भागांत गुरुवारी होळीची अक्षरश: धूम होती.मनातील वाईट विचारांचा नायनाट करून विधायक विचारांची कास धरण्याचा संदेश देणाऱ्या होळी सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाबाबत अनेक पौराणिक दाखलेही प्रसिद्ध आहेत. फाल्गुन पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या लोकोत्सवाला होलिका, शिमगा, दोलायात्रा, फाल्गुनोत्सव आदि विविध नावांनी ओळखले जाते. रस्त्यात वा मैदानात खड्डा खणून त्यात झाडाच्या वाळलेल्या फांद्या, गोवऱ्या जाळून होळी पेटविली जाते. सुवासिनी या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. यंदा होळीसाठी लाकडांऐवजी प्राधान्याने गोवऱ्यांचा वापर झाल्याचे दिसून आले. होळीभोवती रांगोळी काढून, तिच्यावर रंग उधळून सजवलेल्या होळीचे सुवासिनींनी विधिवत पूजन केले. होळीची आरती करण्यात आली. चौका-चौकांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात होळी पेटवून नैवेद्य दाखविण्यात आला. बऱ्याच ठिकाणी पारंपरिकतेला फाटा देत पर्यावरणपूरक होळीचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षतोड टाळण्याचा संदेश देत यानिमित्ताने वृक्षारोपणही करण्यात आले. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. ६) सकाळपासूनच धुळवडीचा खेळ रंगणार आहे. सायंकाळी गोदाघाटावर परंपरेनुसार बाशिंगेवीरांची मिरवणूक काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)