पाच लाखांच्या गुटख्याची होळी
By Admin | Updated: November 2, 2015 23:33 IST2015-11-02T23:32:50+5:302015-11-02T23:33:36+5:30
अवैध धंद्यांविरोधात मोहीम : पोलीस कर्मचाऱ्यांना तंबाखू न खाण्याची दिली शपथ

पाच लाखांच्या गुटख्याची होळी
मालेगाव : येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात पकडलेल्या पाच लाख रुपयांच्या गुटख्याची
आज सकाळी साडेबारा वाजता उपअधीक्षक गजानन राजमाने
यांच्या नेतृत्वाखाली होळी करण्यात आली.
येथील उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी शहर उपअधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे. यात येथील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत एकाच मालकाच्या दोन ठिकाणांवर छापा टाकून त्यांनी पाच लाख ४ हजार ८०० रुपयांचा गुटखा पकडला होता. हा गुटखा आज पवारवाडी पोलीस ठाण्यासमोर जाळण्यात आला.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त य. ब. बेंडकुळे, महानगरपालिकेचे जी. एम. गायकवाड, पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड, सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. मानकर, पोलीस हवालदार नाना चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी उपअधीक्षक राजमाने यांनी तंबाखू खाणाऱ्या काही नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कर्करोगाला निमंत्रण देऊ नका’ असे सांगत तंबाखू न खाण्याची शपथ दिली.
आज जाळण्यात आलेला गुटखा अब्दुल अजीज हाजी मोहंमद (५०) ऊर्फ मामू याच्या मालकीचा असून, यात १ आॅक्टोबर रोजी त्यांच्या मदनीनगर भागातील घरावर छापा टाकून दोन वाहनांसह दोन लाख ७५ हजार रुपये किमतीचा, तर ४ आॅक्टोबर रोजी सवंदगाव शिवारात असलेल्या अलिया मस्जीदजवळील एका ^पत्र्याच्या गुदामावर टाकलेल्या छाप्यात दोन लाख २९ हजार ८०० रुपयांच्या गुटख्यासह सहाशे पोती रेशनची साखर पकडण्यात आली होती. (वार्ताहर)