नाशिकच्या मैदानावर घडला इतिहास
By Admin | Updated: November 10, 2014 00:19 IST2014-11-10T00:19:21+5:302014-11-10T00:19:49+5:30
सहा चेंडूंत सहा गडी बाद करण्याचा वरुणचा विक्रम

नाशिकच्या मैदानावर घडला इतिहास
नाशिक : जिल्हा मान्सून लीग स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात झालेल्या सामन्यात नाशिकचा स्थानिक खेळाडू वरुण अय्यंगार याने सहा चेंडंूत सहा फलंदाज बाद करण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर हा विक्रम नाशिककरांनी अनुभवला़ भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सलग सहा चेंडूंमध्ये सहा गडी बाद करण्याचा विक्रम झाल्याची चर्चा आहे़ नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १४ व १८ वर्षे वयोगटाच्या मान्सून लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ आज द्वारका विरुद्ध व्हॅलेंटाईन इलेव्हन या दोन संघांत सामना रंगला होता़ प्रथम फलंदाजीस उतरलेल्या व्हॅलेंटाईन संघाचा वरुण अयंग्गार हा कर्दनकाळ ठरला़ संघाचे बाविसावे व वैयक्तिक चौथे षटक घेऊन आलेल्या वरुणचा पहिला चेंडू निर्धाव पडला़ दुसऱ्या चेंडूवर व्हॅलेंटाईनचा एक फलंदाज झेलबाद झाला, तर पुढील सलग चार चेंडूंवर चार फलंदाज त्रिफळाचीत झाले़ यानंतर वरुणने त्याच्या पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचीत करत सहा चेंडूंत सहा गडी बाद करण्याचा अनोखा विक्रम केला़ नाशिककरांनी उभे राहून टाळ्या वाजवत वरुणचे कौतुक केले़ भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम अद्याप एकही गोलंदाज करू शकलेला नसल्याची चर्चा मैदानावर रंगली होती़ प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या द्वारकाच्या संघाने चार बाद २४० धावा करून पहिला डाव घोषित केला़ यामध्ये धुवाधार फलंदाजी करत द्वारकाच्या अनिष राव याने १६५ धावा केल्या़