महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा
By Admin | Updated: May 11, 2015 01:39 IST2015-05-11T01:39:25+5:302015-05-11T01:39:50+5:30
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा
नाशिक : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जागा झाला अन् त्यांची गाथा ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. निमित्त होते ‘कलांगण’ उपक्रमात संकेत नेरकर यांच्या ‘जेव्हा गड बोलू लागतात’ या कार्यक्रमाचे. यासह पोलीस बॅण्डचे वादन, नृत्य व ध्वनिचित्रफितीच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. दर रविवारी सायंकाळी शहरातील मोकळ्या चौकात कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे.
प्रारंभी ग्रामीण पोलीस बॅण्डपथकाने वादन केले. ए. क्यू. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शकील शेख, मार्तंड शिरवंत, दादाजी सोनवणे, हरी भोये, गिरीश अमराळे, साहेबराव बलसाने, एस. एम. गुरव, एस. आर. गुरव आदिंच्या पथकाने ‘बलसागर भारत होवो’, ‘सारे जहॉँ से अच्छा’ या देशभक्तिपर गीतांच्या धून वाजवत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर इनोव्हेशन ग्रुपने गणेशवंदना, वासुदेव, शेतकरी नृत्य, ललाटी भंडार (गोंधळ) ही नृत्ये सादर केली. याशिवाय महाराष्ट्रातील ‘ज्ञानपीठ’विजेत्या साहित्यिकांवर विशेष ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. त्यात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, विंदा करंदीकर व भालचंद्र नेमाडे यांच्या लेखनकार्याचा परामर्श घेण्यात आला. विवेक अहिरे यांनी स्वागत केले. मीना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, जिल्हा समन्वयक राजेश जाधव आदिंसह प्रेक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)