...अन् उजळला आर्टिलरीचा इतिहास
By Admin | Updated: December 4, 2015 23:06 IST2015-12-04T23:06:07+5:302015-12-04T23:06:46+5:30
...अन् उजळला आर्टिलरीचा इतिहास

...अन् उजळला आर्टिलरीचा इतिहास
पंकज पाटील, उपनगर
तोफा आणि रणगाड्यांच्या आवाजाने युद्धभूमीचा थरार. आणि सैन्याच्या देदीप्यमान कामगिरीचा इतिहास प्रकाशमान करणारा सोहळा आर्टिलरीच्या मैदानावर उजळून निघाला. लाइट शो आणि रंगारंग लेझर किरणांनी आर्टिलरीच्या शौर्याची गाथा प्रकाशमान झाली. निमित्त होते तोफखाना केंद्राच्या तेराव्या रियुनियन सोहळ्याच्या समारोपाचे.
रंगीत दिव्यांचा गणवेश परिधान केलेल्या एलईडी बॅण्ड पथकाचे संचलन, एलईडी स्क्रीनवर दृश्य स्वरूपात तोफखाना केंद्राचा संपूर्ण इतिहास, तोफखाना दलात आतापर्यंत सेवा बजावलेल्या विविध तोफांचे, चित्ररथांचे दर्शन या सोहळ्यात घडले.
प्रमुख अतिथी म्हणून जनरल पी. आर. शंकर, जनरल एस.एफ. रॉड्रीक्स, पूर्व सेना अध्यक्ष जनरल दीपक कपूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्टिलरी सेंटर नाशिकरोड व हैदराबादच्या रंगीत दिव्यांचा गणवेश परिधान केलेल्या एलईडी बॅण्ड पथकाने संचलन करत उपस्थितांना मानवंदना दिली.
सहभागी झालेल्या तोफांचे चित्ररथ
ग्यानी स्टेडियमवर झालेल्या १३ व्या रियुनियन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी सिक्स फाऊंडर गन, २.७ इंच बीएमएल गन, ३.७ इंच हॅवेत्झर गन, ४.२ इंच मॉर्टर गन, ७५ पॅक हॅवेत्झर गन, १३0 एमएम एमआरएल गन, १२२ एमएम रॉकेट लॉन्चर, १0५ एमएम लाईटवेट गन, ५५५ बोफोर्स गन इत्यादी तोफांचे चित्ररथ मैदानावर सादर करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मैदानावर ब्लॅकआउट करण्यात आले होते. मैदानावर मध्यभागी बसविलेल्या २0 बाय ४0 फूट एलईडी स्क्रीनवर तोफखाना केंद्राचा संपूर्ण इतिहास दृश्य स्वरूपात दाखविण्यात आला. तसेच यावेळी भारतीय तोफखाना दलात आतापर्यंत सेवा बजावलेल्या विविध तोफांचे, चित्ररथांचे दर्शन उपस्थितांना झाले. संपूर्ण अंधारात झालेल्या या आकर्षक रियुनियन सोहळ्यात जवानांनी सादर केलेल्या युद्ध प्रसंगामुळे उपस्थितांच्या अंगात चैतन्य संचारले होते. ब्रिगेडीयर रोहित बुटालिया, ब्रिगेडीयर पी.आर. मुरली, मेजर जे.एस. बेदी यांचे सहकार्य लाभले.