अध्यक्षपदी हिरे, उपाध्यक्षपदी गुळवे
By Admin | Updated: October 14, 2015 23:55 IST2015-10-14T23:52:35+5:302015-10-14T23:55:17+5:30
बिनविरोध : जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ

अध्यक्षपदी हिरे, उपाध्यक्षपदी गुळवे
नाशिक : जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जिल्हा बॅँकेचे संचालक अद्वय हिरे व उपाध्यक्षपदी जिल्हा बॅँक संचालक जिल्हा परिषद सदस्य अॅड. संदीप गुळवे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण गुजराथी यांनी केली.
द्वारका येथील महाराष्ट्र कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता विहित वेळेत अध्यक्षपदासाठी अद्वय हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सूचक म्हणून राजेंद्र डोखळे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश कवडे यांची स्वाक्षरी होती.
तसेच उपाध्यक्षपदासाठी अॅड. संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यास सूचक म्हणून भास्करराव बनकर, तर अनुमोदक म्हणून दिलीप मोरे यांची स्वाक्षरी होती. अर्ज दाखल करण्याच्या विहित वेळेत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गुजराथी यांनी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या अध्यक्षपदी अद्वय हिरे, तर उपाध्यक्षपदी अॅड. संदीप गुळवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत अद्वय हिरे, संदीप गुळवे, जिल्हा बॅँक उपाध्यक्ष सुहास कांदे, राजेंद्र डोखळे, चांगदेवराव होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे संचालक आमदार अपूर्व हिरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब जाधव, निवृत्ती महाले, दिलीप मोरे, प्रकाश कवडे, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ मोरे, संदीप पानगव्हाणे, जिल्हा बॅँक संचालक माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, उषा माणिक शिंदे, लक्ष्मण वाघेरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)