हिंदू धर्मासाठी ‘घरवापसी’ गरजेची
By Admin | Updated: September 15, 2015 23:40 IST2015-09-15T23:39:44+5:302015-09-15T23:40:35+5:30
गोविंदगिरी देव : धर्मजागरण विभाग वनवासी संमेलनात प्रतिपादन

हिंदू धर्मासाठी ‘घरवापसी’ गरजेची
नाशिक : हिंदू धर्मामुळेच जगात शांतता नांदत असून, ती कायम ठेवण्यासाठी धर्माला बळकटी देणे गरजेचे आहे. त्यासाठी धर्मांतरितांची ‘घरवापसी’ गरजेची असल्याचे प्रतिपादन गोविंदगिरी देव महाराज यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय हिंदू वनवासी बांधवांच्या संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंचवटी महाविद्यालयात हे संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर आचार्य विश्वेश्वरदास, अमृतदासजी महाराज, साध्वी अमितज्योती, रामकृष्ण लहवितकर महाराज, स्वामी गोपालाचार्य, क्षेत्रीय धर्मजागरणप्रमुख शरद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंदगिरी देव म्हणाले, आजवर अनेकदा बाहेरच्या प्रवृत्तींकडून हिंदू धर्मावर आघात झाले; मात्र त्याला तोंड देऊन हिंदू धर्म नुसता टिकलाच नाही, तर आणखी तेजस्वी झाला. हिंदू धर्मात अनेक जाती-पाती, पंथ असले, तरी धर्म एकच आहे. आता सर्व धर्म सारखेच असे सांगितले जाते; मात्र त्यात तथ्य नाही. सनातन वैदिक धर्म हा जगात एकमेव असून, त्याला मोठे महत्त्व आहे. धर्मासाठी प्राण द्यावे लागले, तरी हरकत नाही, असे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. त्यामुळे धर्म बळकटीकरणासाठी सतत प्रयत्न व्हावेत.
साध्वी अमितज्योती म्हणाल्या, हिंदू धर्माची शक्ती कमी करण्यासाठी परकीय शक्तींनी जिवापाड प्रयत्न केले; मात्र हिंदू धर्म अखंड राहिला. हिंदू संघटित राहिले, तर कोणी काही वाकडे करू शकणार नाही. रामानुजाचार्य यांनी हिंदू धर्मकार्य हे ईश्वरीय असून, वाट चुकलेल्या बांधवांना पुन्हा स्वधर्मात आणणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. धर्मजागरण सहप्रमुख राजेंद्रसिंह यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, संमेलनात उद्या (दि. १६) सकाळी ८ वाजता वनवासी बांधव पुन्हा मिरवणुकीने स्नानासाठी जाणार आहेत.
४0 हजार बांधवांची घरवापसी
संमेलनात शरद ढोले यांनी घरवापसी उपक्रमाची माहिती दिली. सन २000 पासून धर्मजागरण विभाग सुरू करण्यात आला असून, गेल्या पंधरा वर्षांत नाशिकच्या दोनशे किलोमीटर परिघातील सुमारे ४0 हजार वनवासी बांधवांची अन्य धर्मांतून हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. यांपैकी आठ हजार बांधव सदर संमेलनाला आले असून, त्यांनी तीर्थस्नान केल्याचे ढोले यांनी सांगितले.