पर्वणी आटोपली, उधळपट्टी सुरूच
By Admin | Updated: October 3, 2015 23:40 IST2015-10-03T23:32:43+5:302015-10-03T23:40:31+5:30
यंत्रणांचे दुर्लक्ष : बाह्य वाहनतळांवरील सुविधा कायम

पर्वणी आटोपली, उधळपट्टी सुरूच
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या बाह्य वाहनतळांवरील सुविधा पर्वण्या आटोपल्यावरही कायम असून, विशेष करून रात्रीच्या वेळी सर्वच वाहनतळे विजेच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत असताना या उधळपट्टीकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
नाशिक शहराला येऊन मिळणाऱ्या सर्वच रस्त्यांवर म्हणजेच राजूर बहुला, माडसांगवी, मोह शिवार, तवली फाटा, के. के. वाघ महाविद्यालय या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या खासगी मोटारीने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ उभारण्यात आले होते. या ठिकाणी भाविकांनी आपली वाहने उभी करून नंतर एस.टी. बसने शहरातील अंतर्गत वाहनतळापर्यंत प्रवास करावा यासाठी ते नियोजन करण्यात आले होते. एकाच वेळी हजारो भाविक वाहनतळांवर येणार असल्याचे पाहून त्यांच्या सोयीसाठी वाहतळांवर शौचालय, पाण्याची टाकी, निवारा शेड, मदत केंद्र आदि सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी शेकडो विजेचे दिवे लावण्यात आले होते. प्रत्यक्षात सिंहस्थ पर्वणीकडे अपेक्षित असलेल्या भाविकांनी पाठ फिरविली, परिणामी तयार करण्यात आलेल्या सुविधांचाही वापर होऊ शकला नाही. आता मात्र कुंभमेळ्याच्या पर्वण्या आटोपून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, या वाहनतळांवरील सुविधा अद्यापही कायम आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशझोताच्या विजेच्या दिव्यांचा लखलखाट कायम असून, दररोज शेकडो युनिट विजेचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे बाह्य वाहनतळांचा वापर हा फक्त पर्वणीच्या काळात तीनच दिवसांपुरता मर्यादित असताना पर्वणी आटोपल्यानंतरही विजेची उधळपट्टी सुरूच होती. या बाह्य वाहनतळांवर पुरविण्यात आलेली विजेची देयके काही ठिकाणी महापालिका, तर काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याला अदा करायची आहेत. परंतु या दोन्हीही यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष असून, जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. (प्रतिनिधी)