अडथळे नसलेल्या मोटारींची ‘उचलेगिरी’
By Admin | Updated: April 1, 2017 00:48 IST2017-04-01T00:48:18+5:302017-04-01T00:48:41+5:30
नाशिक : शहरात कोठेही नो पार्किंगचे फलक नाही, त्यामुळे वाहने कोठे लावावी अशी अडचण असतानाच मोटारी उचलणाऱ्या ठेकेदारांचे हेच फावले असून, वाहतुकीला अडथळा न ठरलेली वाहने उचलली जात आहेत.

अडथळे नसलेल्या मोटारींची ‘उचलेगिरी’
नाशिक : शहरात कोठेही नो पार्किंगचे फलक नाही, त्यामुळे वाहने कोठे लावावी अशी अडचण असतानाच मोटारी उचलणाऱ्या ठेकेदारांचे हेच फावले असून, वाहतुकीला अडथळा न ठरलेली वाहने उचलली जात असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली मोटारी उचलण्याची मोहीम वारंवार वादग्रस्त ठरली आहे. शहरात कोठेही वाहनतळे नाहीत की सम-विषम तारखांना मोटारी लावण्याची व्यवस्था नाही, अशा स्थितीत मोहीम सुरू करण्यास नागरिकांचा विरोध होता. मात्र, तरीही माजी पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनी हट्टाने मोटार टोर्इंग सुरू केली. ही मोहीम सुरू झाली तेव्हापासून वाद सुरूच असून, नागरिकांची अकारण पिळवणूक केली जात आहेत, अशा तक्रारी आहेत. शहरात वाहनतळाची सोय नसल्याने त्यास विरोध होत असताना जगन्नाथन यांनी ही मोहीम बळजबरी सुरू केली आणि त्याचा त्रास आजही शहरवासीयांना होत आहे. शहरात रस्त्याच्या कडेला अगदी कोणालाही त्रास होत नाही अशा पद्धतीने दुचाकी किंवा अन्य मोटार उभी केली की ती तत्काळ उचलली जाते. त्याबाबत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना कितीही सांगून उपयोग होत नाही. बरे तर ही मोहीम केवळ शहराच्या काही भागांतच असून, जेथे खरोखरीच बेशिस्त पद्धतीने वाहने उभी आहेत, अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाईच होत नाही. वाहतूक सुधारण्याच्या नावाखाली ही अकारण अडवणूक सुरू असून, आधी वाहनतळांसाठी जागा निश्चित कराव्या आणि मगच वाहने उचलावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
‘नो पार्किंग’चा फलक नसताना उचलेगिरी
माझी मोटार पंडित कॉलनीत वाहतुकीला अडथळा न करता उभी करण्यात आली होती. मी माझे काम उरकून संबंधित व्यापारी संकुलाखाली गेलो तेव्हा मोटार गायब होती आणि ती टोर्इंग करून नेल्याचे सांगण्यात आले. मी संबंधित कार्यालयात गेल्यानंतर कोणताही पुरावा न देता मोटार चुकीच्या ठिकाणीच उभी केल्याचे सांगण्यात आले. नो पार्किंगचा फलक नसताना कायदेशीरदृष्ट्या ही मोटार चुकीच्या ठिकाणी उभी होती असे कसे म्हणता येईल? तरीही माझ्याकडून २७० रुपये घेण्यात आले.
- रवींद्र अदयप्रभू, रहिवासी पंचवटी