स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणारा गजाआड
By Admin | Updated: June 9, 2014 01:00 IST2014-06-09T00:59:23+5:302014-06-09T01:00:24+5:30
नाशिक : कर्जबाजारीपणामुळे घरच्यांकडूनच पैसे उकळण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या संगणक अभियंत्याला नाशिक पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली़

स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणारा गजाआड
नाशिक : कर्जबाजारीपणामुळे घरच्यांकडूनच पैसे उकळण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या संगणक अभियंत्याला नाशिक पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली़ अतिशय वेगात तपास करत अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी हा बनाव उघडा पाडला़
कॅनडा कॉर्नर येथे राहणारा मधुसूदन कलंत्री असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या संगणक अभियंत्याचे नाव आहे़ गुरुवारी सायंकाळी कलंत्री कुटुंबीयांच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, तो सुरक्षित हवा असल्यास ३० लाख रुपये पाठविण्याच्या धमकीचा एसएमएस पाठविण्यात आला होता़ या प्रकारामुळे घाबरलेल्या कलंत्री कुटुंबीयांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती़
पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सूर्यवंशी तसेच सायबर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण कौशल्याने हाताळले़ पोलीस आयुक्त सरंगल यांनी दिल्ली, अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधून तेथील सायबर क्राईम ब्रँचची मदत घेतली़ दिल्ली येथील पहाडगंज भागातील एका हॉटेलमधून सदर अभियंत्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल़े (प्रतिनिधी)