महामार्गांचे काम सुसाट; ग्रामीण रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:12+5:302021-08-15T04:17:12+5:30

सिन्नर (शैलेश कर्पे) : नाशिक, पुणे व औरंगाबाद या मोठ्या शहरांचा सुवर्णमध्य असलेल्या सिन्नर तालुक्यात औद्योगिकीकरणामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढत ...

Highway work smooth; Wait for the rural roads | महामार्गांचे काम सुसाट; ग्रामीण रस्त्यांची लागली वाट

महामार्गांचे काम सुसाट; ग्रामीण रस्त्यांची लागली वाट

सिन्नर (शैलेश कर्पे) : नाशिक, पुणे व औरंगाबाद या मोठ्या शहरांचा सुवर्णमध्य असलेल्या सिन्नर तालुक्यात औद्योगिकीकरणामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढत असल्याने विविध महामार्गांचे काम सुसाट सुरू असले तरी ग्रामीण भागातील जनतेला या महामार्गाच्या कामामुळे स्वत:च्या हक्काच्या रस्त्यांची चाळण झालेली पहावी लागत आहे. महामार्गांच्या कामामुळे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अक्षरश: खड्डेमय झाले असल्याचे चित्र आहे.

मुसळगाव आणि माळेगाव औद्योगिक क्षेत्रामुळे सिन्नरचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले आहे. औद्योगिकीकरणामुळे येथे परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सिन्नरला राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण झाल्यागत होऊ लागले आहे. तथापि, महामार्गांचे काम सुसाट सुरू असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचे काम सिन्नर तालुक्यात प्रगतिपथावर आहे. हा समृद्धी महामार्ग तालुक्याच्या पश्चिम भागातून पूर्व भागात सुमारे ७० किलोमीटर लांबीचा आहे. जमिनीपासून उंच असणाऱ्या या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात भरावाची गरज भासली. त्यामुळे टंपरने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून बंधारे व शेतजमिनी उपसून भर टाकण्यात आली. माती, मुरुम व दगडाची भर टाकण्यासाठी शेकडो अवजड डंपर जिल्हा परिषद व अन्य स्थानिक रस्त्यांवरून धावले. या अवजड वाहनांमुळे पश्चिम पट्ट्यासह पूर्व भागातील ग्रामीण रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याचे चित्र आहे. पूर्व भागातील वावी परिसरात त्याचबरोबर गोंदे शिवारातील रस्त्यांची अवजड वाहनांनी अक्षरश: चाळण केली आहे. अनेक किलोमीटरचा डांबरी रस्ता या अवजड वाहनांनी डांबरी होता की नाही, असा करून ठेवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम समृद्धी महामार्गाच्या अवजड वाहनांनी केले आहे.

-------------------------

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था

सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम पूर्व भागात सुरू आहे. या महामार्गाच्या कामासाठीही मॉॅॅॅटोकॉर्लो कंपनीची अनेक अवजड वाहने पूर्व भागातील ग्रामीण रस्त्यावरून धावत असल्याचे चित्र आहे. या अवजड वाहनांनी समृद्धी महामार्गाच्या तडाख्यातून सुटलेल्या अन्य ग्रामीण रस्त्यांचीही वाट लावण्यात कसूर ठेवली नाही. या दोन मोठ्या महामार्गांचे काम प्रगतिपथावर असताना सूरत-हैद्राबाद या महामार्गाच्या कामासाठीही सर्वे सुरू असून लवकरच जमीन अधिग्रहण होणार असल्याची चर्चा आहे.

-------------------

दळणवळणच संथगतीने

सिन्नर तालुक्यात मोठ्या महामार्गांचे जाळे निर्माण होत असले तरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेल्या जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांकडे लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच रस्ते सुस्थितीत आहेत. उर्वरित सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने ग्रामीण दळणवळण संथगतीने होत असल्याचे चित्र आहे.

-----------------

विमानतळ रस्त्यावर घोडेस्वारीचा अनुभव

ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ यांना जोडण्यासाठी डांबरीकरणाचा रस्ता रुंद व नवीन बनविण्यात आला. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामामुळे वावी ते सायाळेदरम्यानचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याने प्रवास करताना खड्ड्यांचे साम्राज्य तर आहेच; मात्र या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने आदळत चालल्याने घोडेस्वारी करीत असल्याचा अनुभव येतो. या दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

------------------------

ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या रस्त्याची वावी ते सायाळेदरम्यान झालेली दुरवस्था. (१४ सिन्नर रस्ता)

140821\14nsk_18_14082021_13.jpg

१४ सिन्नर रस्ता

Web Title: Highway work smooth; Wait for the rural roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.