मालेगाव : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील महामार्ग पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानास सुरुवात करण्यात आली. हे अभियान १० जानेवारी ते २४ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असून, यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचे उद्घाटन रविवारी (दि.१०) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कदम यांच्या हस्ते करण्यात आले, तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात लोणवाड्याचे सरपंच गोलाईत यांनी वाहतूक नियमांचे पालन, रस्ता सुरक्षा आदिंवर मार्गदर्शन केले. महामार्गावर, चाळीसगाव चौफुली, झोडगे येथे वाहतूक नियमांचे माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. मालेगाव महामार्ग पोलिसांच्या हद्दीतील महामार्ग क्र. ३ वर २०१५मध्ये एकूण ९७ अपघात घडले. या अपघातात २६ जणांवर प्राणास मुकण्याची वेळ आली, तर १४९ जण जखमी झाले. या वर्षात महामार्ग पोलिसांनी अकरा हजार ११६ वाहन-चालकांवर केस करून बारा लाख ३१ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.
महामार्ग पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानास सुरुवात
By admin | Updated: January 12, 2016 22:54 IST