महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: December 8, 2015 22:46 IST2015-12-08T22:45:53+5:302015-12-08T22:46:47+5:30
अपघाताचे सत्र : नियोजन नसल्याने उपनगर चौक धोकेदायक

महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर ते गांधीनगर दरम्यान गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
उपनगर नाका येथील धोकेदायक काळवंडलेला दुभाजक व नाशिककडून येणारे वाहनचालक उपनगर नाका येथून जयभवानी रोडला जात असल्याने छोटे-मोठे अपघांत नित्याचीच बाब झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच उपनगर नाका येथे १० चाकी ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता आर. एस. सोमवंशी, अभियंता मनोज पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी उपनगर नाका ते विजय-ममता मार्गाची पाहणी केली. महामार्गाच्या दुतर्फा असलेले धोकेदायक झाडे, उपनगर नाका येथे सिग्नल बसविणे, महामार्गावरील चौफुलीवर झेब्रा पट्टे मारणे, बंद पथदीप सुरू करणे, महामार्गावरील बसथांबे मागे सरकवणे, दुभाजकांना रंगरंगोटी व बाजूने रिफ्लेक्टर लावणे, दुभाजकामध्ये सूचना फलक लावणे अशा विविध मागण्या केल्या. नगरसेवक कुणाल वाघ यांनी वाहतूक सुरक्षित कशी करता येईल यासंदर्भात लवकरच पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, मनपा, एसटी महामंडळ यांची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. यावेळी विश्वास सागर, दत्तात्रय क्षीरसागर, छबू ताजनपुरे, विष्णु दोंदे, रवि पगारे, अजय सोमवंशी, प्रशांत बटाव, नीलेश सहाणे आदिं उपस्थित होते. (वार्ताहर)