जिल्ह्यात कांद्याच्या दराचा उच्चांक
By Admin | Updated: August 18, 2015 00:29 IST2015-08-18T00:28:12+5:302015-08-18T00:29:35+5:30
लासलगाव @ ४७११ : हंगामातील सर्वाधिक भाव

जिल्ह्यात कांद्याच्या दराचा उच्चांक
लासलगाव : अवकाळी व गारपिटीने कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीने घटलेल्या उत्पादनाबरोबरच प्रथम क्रमांकाच्या दर्जेदार कांद्याची आवक होत नसल्यामुळे सोमवारी लासलगाव येथील बाजारपेठेत कांद्याच्या कमाल भावात तब्बल ७०९ रुपये प्रतिक्विंटल तेजी येऊन हंगामातला सर्वाधिक ४७११ रुपये भाव जाहीर झाला.
या हंगामातील सर्वाधिक भाव सोमवारी जाहीर झाला असला तरी प्रथम दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत नसल्याने बोटावर मोजता येईल अशाच शेतकऱ्यांना हा भाव मिळत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याची प्रतवारी खराब झालेली आहे तसेच उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक फारच कमी होत आहे. तरीही सोमवारी जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत याच पध्दतीने भाव जाहीर झाले आहेत.
जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत उन्हाळ कांद्याचे भाव वाढल्याने नाफेडने परराज्यात महत्त्वाच्या बाजारपेठत खरेदी केलेला कांदा पाठविला आहे.
कांद्याची आवक कमी आहे व यापूर्वीच मोदी सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य २५० डॉलर प्रति मेट्रिक टनावरून थेट ४२५ डॉलर इतके जाहीर केले आहे व एक प्रकारे कांद्यावर अघोषित निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक चिंतित आहेत. पाकिस्तानने रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात होण्यासाठी परवानगी दिली होती. भारतात कांदा कमी पडू नये यासाठी मोदी सरकारने पाकिस्तान, चीन व इजिप्त या तीन देशांतून दहा हजार मेट्रिक टन कांदा आयातीला परवानगी दिली आहे. परंतु हा कांदा येण्यास अवधी लागणार आहे. मात्र काही खासगी व्यापारी इजिप्त या देशातून कांदा आयात करीत असल्याची माहिती आहे. तसेच परदेशी सीमा खुली झाली आहे, अशीही माहिती हाती आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून देशी व सीमेवरील मागणीचा दाब वाढल्याने सोमवारी कांदा बाजारपेठेत एकाच दिवशी सातशे रुपयांची कमाल भावात तेजी आली. (वार्ताहर)