शिक्षण समितीवर महाआघाडीचा दावा
By Admin | Updated: July 3, 2015 23:19 IST2015-07-03T23:12:43+5:302015-07-03T23:19:55+5:30
आज निवडणूक : चव्हाण द्वयींची वर्णी शक्य

शिक्षण समितीवर महाआघाडीचा दावा
नाशिक : महापालिका शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक होणार असून, समितीवर मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष गटाच्या महाआघाडीने बहुमताचा दावा सांगितला आहे. त्यामुळे सभापतिपदी अपक्ष संजय चव्हाण आणि उपसभापतिपदी मनसेचे गणेश चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पमतात असलेल्या सेना-भाजपा युतीचा भरवसा नेहमीप्रमाणेच चमत्कारावर असून, या साऱ्या घडामोडीत कॉँग्रेस एकाकी पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी शनिवारी अपर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सभापतिपदासाठी संजय चव्हाण (अपक्ष), योगीता अहेर (कॉँग्रेस), वत्सला खैरे (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा), सुनीता निमसे (राष्ट्रावादी) आणि मीना माळोदे (मनसे) या सात उमेदवारांनी, तर उपसभापतिपदासाठी वत्सला खैरे व योगीता अहेर (कॉँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्योती गांगुर्डे (भाजपा) आणि गणेश चव्हाण (मनसे) या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिक्षण समितीवर मनसे-५, राष्ट्रवादी-३, कॉँग्रेस-२, शिवसेना-३, भाजपा-२, अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष यांची महाआघाडी सत्तेवर आहे. सभापतिपदासाठी महाआघाडीतील सर्वच पक्षांनी उमेदवार दिले असले तरी महाआघाडीच्या पदवाटपाच्या सूत्रानुसार अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांची सभापतिपदी, तर मनसेचे गणेश चव्हाण यांची उपसभापतिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कॉँग्रेसच्या वत्सला खैरे व योगीता अहेर या दोहोंनी अर्ज दाखल केले असल्याने आणि कॉँग्रेस गटनेते उत्तमराव कांबळे यांनी महापौरांना पत्र देत दोन्हींपैकी कुणा एकाचा सभापती-उपसभापती पदाकरिता विचार करण्याची विनंती केली असल्याने कॉँग्रेस रिंगणात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र उरल्यासुरल्या दीड वर्षात एकाकी पडण्याचीही भीती कॉँग्रेसला असल्याने ऐनवेळी महाआघाडीलाही पाठिंबा देण्याची शक्यता नाकारली जात नाही. प्रामुख्याने दोन्हीपैकी एक उमेदवार ऐनवेळी माघार घेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीला स्थायी समिती सभापती पद आणि विरोधी पक्षनेते पद बहाल केले असल्याने राष्ट्रवादीकडूनही ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते.
सेना-भाजपाकडे अवघे ५ संख्याबळ असल्याने त्यांची भिस्त महाआघाडीतील फुटीवरच राहणार आहे; परंतु महाआघाडीने कॉँग्रेस वगळता आपल्याकडे भक्कम बहुमताचा दावा केला आहे. कॉँग्रेसने पाठिंबा दिला नाही तरी महाआघाडीकडे नऊ इतके संख्याबळ होते. त्यामुळे सहज विजयाचा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)