सायकलप्रेमींची ‘हेरिटेज राईड’
By Admin | Updated: January 25, 2016 00:13 IST2016-01-24T23:12:55+5:302016-01-25T00:13:00+5:30
उपक्रम : प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंना दिली भेट

सायकलप्रेमींची ‘हेरिटेज राईड’
नाशिक : शहराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून, पंचवटी ते तपोवन परिसरात याची साक्ष देणारी अतिप्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून, संस्कृतीची जोपासना होत आहे. हा अमूल्य वारसा जोपासण्याचा संदेश शहरातील शेकडो सायकलप्रेमींनी ‘हेरिटेज सायकल राईड’द्वारे दिला.
शहरातील ही प्राचीन मंदिरे, वाडासंस्कृती याबद्दल जनजागृती करण्यासाठी, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे व वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा आणि इंधनाचा वापर कमी होऊन सायकलचा वापर वाढीस लागावा, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२४) सकाळी साडेसहा वाजता या आगळ्यावेगळ्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बहुसंख्य आबालवृद्ध सायकलप्रेमी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत सायकल घेऊन सहभागी झाले होते. सायकलला पॅडल मारत उत्साहाने सायकलस्वारांनी शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करत थंडीवर मात केली.
नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंघ बिरदी, डॉ. मनीषा रौंदळ, श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, किरण चव्हाण, दत्तू आंधळे, शैलेश राजहंस, रोहित वैशंपायन, कृष्णा प्रसाद आदि या सायकल फेरीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)