लोणजाई डोंगरावर औषधी वनस्पती
By Admin | Updated: November 15, 2016 00:35 IST2016-11-15T00:30:55+5:302016-11-15T00:35:45+5:30
निफाड : सोनेवाडीजवळील भाविकांच्या श्रद्धास्थानाचे वाढले महत्त्व

लोणजाई डोंगरावर औषधी वनस्पती
निफाड : तालुक्यातील सोनेवाडीजवळील लोणजाई डोंगरावर असलेले लोणजाई देवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीनेही हा डोंगर चर्चेत आला आहे. या डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष नाशिक येथील वनस्पती संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ जुई पेठे यांनी काढला आहे.
निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर हा नाशिक-औरंगाबाद रस्त्यापासून ५ ते ६ किमी अंतरावर सोनेवाडी गावाजवळ आहे. या डोंगराचे क्षेत्र ६० ते ६५ एकर आहे. या डोंगरावरील वनसंपत्ती कमी होत चालल्याने हा पुरातन डोंगर पुन्हा हिरवागार करावा या उद्देशाने निफाड येथील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांच्या पुढाकाराने व येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने वर्षभरापासून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध संस्था शाळा, गावे यांच्या मदतीने या डोंगरावर वृक्षारोपण सुरु असून लोणजाई डोंगर पुन्हा हिरवाईने नटायला लागला आहे. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगड आणि अंजनेरी पर्वत या परिसराप्रमाणेच लोणजाई डोंगरही जैवविविधतेने नटलेला आहे. दुर्मीळ औषधी वनस्पती या डोंगरावर मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा अभ्यास करावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी निफाड येथील समर्थ सेवेकरी वि. दा. व्यवहारे व त्यांच्या सहकार्यांना केले आहे. यातील बऱ्याचशा वनस्पती किडनी स्टोन कावीळ, कॅन्सर अशा असाध्य आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या आहेत, अशी माहिती जुई पेठे यांनी दिली.(वार्ताहर)