महिला उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी त्यांचे पती सरसावले
By Admin | Updated: October 7, 2014 01:48 IST2014-10-07T01:47:36+5:302014-10-07T01:48:14+5:30
महिला उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी त्यांचे पती सरसावले

महिला उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी त्यांचे पती सरसावले
नाशिक : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असे म्हणतात. तथापि, निवडणुकीच्या रणांगणात मात्र काही मतदारसंघांत वेगळी परिस्थिती असून, महिला उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी त्यांचे पती सरसावले आहेत. काही मतदारसंघांत तर या पतिदेवांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघितला, तर लोकसभा निवडणुकीतील अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीत मोठे घवघवीत यश महिलांनी मिळवले आहे. आताही जिल्हा परिषद आणि अन्य पदांवरही महिला दावेदारी करीत आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात पंधरा मतदारसंघांत एकूण १६ महिला उमेदवार रिंगणात आहेत. यात सटाणा तालुक्यात सर्वाधिक सहा महिला उमेदवार आहेत. त्यापाठोपाठ नांदगावला दोन, चांदवड, येवला, सिन्नर, पूर्व आणि मध्य नाशिक या मतदारसंघांत प्रत्येकी एक याप्रमाणे महिला उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या पतींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सटाणा तालुक्यात माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने चव्हाण यांची आमदारकी रद्द झाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसने दीपिका यांना उमेदवारी दिली असून, त्या पार्श्वभूमीवर संजय चव्हाण यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गावागावांत फिरून प्रचार करतानाच चौक सभा घेऊन ते प्रचार करीत आहेत. याच मतदारसंघात कॉँग्रेसच्या जयश्री मच्छिंद्र बर्डे यांच्यासाठी त्यांचे पती हेदेखील व्यूहरचना करून त्याला मूर्त स्वरूप देत आहेत. सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शुभांगी गर्जे यांच्यासाठी त्यांचे पती सुरेश गर्जे गावागावांत फिरून मतदारांशी संपर्क साधत आहेत. नाशिक शहरात पश्चिम विभागातील उमेदवार सीमा हिरे यांचे नगरसेवकपदापासूनची सर्व धुरा त्यांचे पती महेश हिरे हेच सांभाळतात. तेच आताही प्रचार यंत्रणा राबवित आहेत. मध्य नाशिकमध्ये उमेदवारी करणाऱ्या प्रा. देवयानी फरांदे यांचे पती पडद्यामागील सर्व व्यूहरचना करीत असतात. देवयानी फरांदे प्रत्यक्ष निवडणूक हाताळण्यास आणि कामकाज करण्यास सक्षम असल्याचे प्रा. सुहास फरांदे सांगतात.