वनौषधी उद्यानाचा मार्ग सुकर
By Admin | Updated: June 10, 2015 00:07 IST2015-06-10T00:06:40+5:302015-06-10T00:07:17+5:30
मनपा महासभेची मान्यता : विरोधकांकडून प्रकल्पाचे स्वागत पण सावध पवित्रा

वनौषधी उद्यानाचा मार्ग सुकर
नाशिक : पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या जागेत वनौषधी उद्यानाच्या माध्यमातून पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या प्रकल्पाला आणि त्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ व नाशिक महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यास महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली. महापालिकेवर आर्थिक भार येणार नसेल तर सदर प्रकल्प स्वागतार्ह असल्याची सावध भूमिका कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा सदस्यांनी घेतली, तर सभागृहाबाहेर विरोधाची गर्जना करणाऱ्या शिवसेनेने आश्चर्यकारकरीत्या चुप्पी साधली. प्रकल्पाबाबत कोणताही आर्थिक भार महापालिकेवर येणार नसल्याचा निर्वाळा महापौर व आयुक्तांनी दिल्यानंतर सभागृहाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील वनौषधी उद्यानाचा मार्ग सुकर केला.
वनौषधी उद्यान विकसित करणे आणि त्यासाठी सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेला आला असता प्रारंभीच कॉँग्रेस गटनेते उत्तमराव कांबळे यांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. सदर प्रस्ताव अर्धवट व संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगत कांबळे यांनी महापालिकेला देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावाच लागणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. महापालिकेला या प्रकल्पाचा कोणताही फायदा होणार नसल्याचेही कांबळे यांनी ठामपणे सांगत आवळा देऊन कोहळा काढण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. कांबळे यांचा विरोधाचा सूर लक्षात घेता महापौरांनी मिळकत अधिकारी बी. यू. मोरे यांना करारनाम्याची माहिती देण्यास सांगितले. मोरे यांनी सदर प्रकल्प टाटा ट्रस्टमार्फत सीएसआर उपक्रमांतर्गत होणार असल्याचे सांगत महापालिकेला त्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नसल्याचे स्पष्ट केले; मात्र मोरे यांच्या स्पष्टीकरणानंतरही कांबळे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत कुणाच्या तरी दबावाखाली हा प्रकल्प होत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी महापालिकेवर प्रकल्पाचा बोजा पडणार नसेल तर स्वागत असल्याचे सांगत प्रत्यक्ष लाभ लक्षात आल्यानंतरच अभिनंदनास पात्र ठरवू, असे स्पष्ट केले. भाजपाचे प्रा. कुणाल वाघ यांनी प्रकल्पाचे स्वागत करतानाच शहरातील फाळके स्मारक, उद्यानांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. त्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली. दिनकर पाटील यांनीही प्रकल्पाचे आभासी चित्र तयार केले जात असल्याबद्दल खिल्ली उडवत सदर प्रकल्प फसवा असल्याचा आरोप केला. मनसेचे यशवंत निकुळे, सुदाम कोंबडे, रमेश धोंगडे, अनिल मटाले, सभागृहनेते सलीम शेख यांनी सदर प्रकल्प नाशिककरांसाठी उपयुक्त असल्याची प्रशंसा करत मंजुरी देण्याची सूचना केली. तासभर चाललेल्या चर्चेनंतर महापौरांनी सभागृहाच्या सूचनांचे स्वागत करत महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याने सदर प्रकल्पास मान्यता देत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)